दोडामार्ग l प्रतिनिधी :राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी गुरुवारी रात्री दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला ‘सरप्राईज’ व्हिजीट दिली. या दरम्यान वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. यावरून पालकमंत्र्यांनी आरोग्य प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराचा आढावा घेतला. रुग्णालयातील ॲडमिट रुग्णांची तसेच नातेवाईकांशी त्यांनी संवाद साधला. रुग्णालयातील उपलब्ध औषध साठा व मिळणारी सेवा याबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली.
अनुपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. मसुरकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांची चांगली खरडपट्टी काढली. रुग्णालयातील कामात बेजबाबदारपणा सहन करणार नाही. रुग्णांना चांगली सेवा द्या असे सांगत त्यांनी चांगलेच खडसावले.
यावेळी त्यांनी दोडामार्ग पोलीस स्टेशनलाही अचानक भेट दिली. पालकमंत्र्यांच्या या अचानक भेटीमुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्याशी त्यांनी तालुक्यातील अवैद्य धंद्यांबाबत चर्चा केली. तालुक्यात अवैद्य धंद्यांना थारा देऊ नका. गाठ माझ्याशी आहे असं सांगत कारभार सुधारा, असे सुनावले.











