khed : भरधाव बलकर कंटेनरची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

खेड  : राकेश कोळी

खेड शहराचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या भरणे नाका परिसरात आज सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने एकाचा बळी घेतला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगात धावणाऱ्या बलकर कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार शांताराम गोरीविले (रा. खेड तालुका) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा सहकारी शांताराम तांबट हा गंभीर जखमी झाला आहे.

सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार चाकाखाली सापडल्याने त्यांचा चेहरा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे अपघाताचा दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मृत स्वार आणि त्याचा सहकारी यांनी मद्यप्राशन केले असल्याची चर्चा घटनास्थळी रंगली होती. भरणे नाका परिसरातील रस्त्यांची दुर्दशा आणि वाहतुकीतील गोंधळामुळे अपघातांचा धोका सतत वाढत आहे. अपूर्ण आणि अरुंद रस्त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होताना दिसते. उड्डाणपुलाखाली वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करून मनमानी वाहन चालवतात. विशेष म्हणजे, येथे पोलीस चौकी असतानाही अपघाताच्या वेळी कोणताही अधिकारी वा कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा गंभीरपणे लक्ष वेधले गेले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाने तातडीने रस्त्यांच्या दुरुस्तीसह वाहतूक नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. अन्यथा अशा अपघातांची मालिका सुरूच राहील, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.