चिपळूण (प्रतिनिधी)-:– वाशिष्ठी सारखा एक मोठा प्रकल्प कोकणात उभा राहिला आहे,आणि या प्रकल्पातून दर्जेदार उत्पादने तयार होत आहेत. या प्रकल्पामुळे येथील शेतकरी समृद्धीकडे वाटचाल करत आहे आणि येथील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दात राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.-भरतशेठ गोगावले यांनी वाशिष्ठी डेअरीचे कौतुक करत सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
महाडचे आमदार तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.भरतशेठ गोगावले शनिवारी चिपळूणात एका खाजगी कामानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी आवर्जून वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधून वाशिष्ठी प्रकल्प पाहण्याची इच्छा व्यक्त केली. प्रशांत यादव यांनी तात्काळ त्यांना आग्रहाचे निमंत्रण दिले,व त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी देखील केली. दुपारनंतर ना.भरतशेठ गोगावले यांचे पिंपळी येथील वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रकल्पात आगमन झाले. यावेळी चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, सौ.स्मिता चव्हाण, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, प्रवर्तक सौ.स्वप्ना यादव यांनी ना.भरतशेठ गोगावले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आम.रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त “एक पेड माँ के नाम”उपक्रमांअंतर्गत वाशिष्ठी प्रकल्प परिसरात ना.गोगावले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर ना.भरतशेठ गोगावले यांनी वाशिष्ठी दूध प्रकल्पाची पूर्ण पाहणी केली. येथील उत्पादन तसेच तांत्रिक उपकरणाची माहिती देखील घेतली.वाशिष्ठी प्रकल्पाची क्षमता, संलग्न शेतकरी, कोकणातून होणारी दुधाची आवक आणि उपलब्ध होणारा रोजगार अशी इत्यंभूत माहिती ना.गोगावले यांनी घेतली. तसेच प्रकल्पाचा परिसर, येथील व्यवस्थापन, नियोजन हे सर्व पाहिल्यानंतर ना.गोगावले बेहद्द खुश झाले. आपल्या कोकणात इतका मोठा दूध प्रकल्प उभा करून तो यशस्वीपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी प्रशांत यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून कौतुक केले.
मी वाशिष्ठी प्रकल्प व प्रशांत यादव यांच्या बद्दल ऐकून होतो. आज प्रत्यक्ष पाहिले आणि मनस्वी समाधान झाले. मी पुन्हा येथे येणार आहे.असे आवर्जून नमूद करत या प्रकल्पाला श्यक्य असेल ते सर्व सहकार्य करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होईल. कोकणातील शेतकऱ्यांनी व सर्वसामान्य जनतेने या प्रकल्पाला आपला प्रकल्प म्हणून सदैव मदत करावी असे आवाहन देखील ना.भरतशेठ गोगावले यांनी यावेळी केले.
यावेळी माजी सभापती रामदास राणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, माजी नगरसेवक विजयशेठ चितळे, अनिल चिले, अन्वर जबले, जनार्दन पवार, चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के, मालघरचे सरपंच सुनील वाजे, भिलेच्या सरपंच आदिती गुडेकर, रुही खेडेकर, अंजली कदम, अभिनव भुरण, राहुल पवार, सुरज पडवेकर, फैसल पिलपिले, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक साबळे, संचालक सोमा गुडेकर, राजेंद्र भोसले, ॲड. नयना पवार, वाशिष्ठी डेअरीचे संचालक महेश खेतले, प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, वाशिष्ठी डेअरीचे सरव्यवस्थापक लक्ष्मण खरात, व्यवस्थापक प्रदीप मगदूम, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
निधीवरून कोणतेही वाद नाही
यावेळी ना. भरत गोगावले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, महायुतीमध्ये निधी वाटपावरून कोणताही वाद नाही. भाजपबरोबर प्रथम शिवसेनेने युती केली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना आम्हाला भरभरून निधी मिळाला. प्रचंड प्रमाणात मतदार संघात निधी आला. त्यामुळे आता संयमाने घ्यायचे ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिंदे गटात देखील निधीवरून कोणताही वाद नाही. यावेळी प्रथमच निवडून आलेल्या नव्या आमदारांना पहिल्या टप्प्यात जास्तीचा निधी द्यायचे असे ठरले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. आगामी निवडणुका संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, लोकसभा, विधानसभा आम्ही महायुती म्हणून लढली. त्यामुळे आगामी निवडणुका देखील नेत्यांमध्ये समन्वय राखून महायुतीनेच लढल्या जातील. मात्र, कोठे अडचण असेल अशा अपवादात्मक ठिकाणी निर्णय होईल आमची पण त्यासाठी तयारी आहे, असे सांगितले .
रायगडचे पालकमंत्री पद आपल्यासाठी प्रतीक्षेत आहे. या मुद्द्यावर बोलताना मंत्री गोगावले म्हणाले, आपल्यासाठी पालकमंत्री पद महत्त्वाचे नाही. पालकमंत्री असले काय नसले काय आपण काम करणारा कार्यकर्ता आहोत. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पदाची गरज नसते. परंतु पालकमंत्री पद आमचे हक्काचे आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड मध्ये शिंदे शिवसेनेचे आठ आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत .हे गणित लक्षात घेता पालकमंत्री मिळणे हा आमचा हक्क आहे. मंत्रीपद दिले आहे बघू आता नेते प्रयत्न करत आहेत .कदाचित नवरात्र उत्सवानंतर पालकमंत्री पद मिळेल. त्यासाठी आपण देवीला साकडे घालू .देवीने आमचे ऐकले तर पालकमंत्री पद मिळेल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे असे त्यांनी सूचक विधान केले. ज्या महिलांनी आम्हाला निवडून दिले त्या लाडक्या बहिणींना आम्ही विसरणार नाही त्यामुळे ही योजना बंद पडणार नाही असे त्यांनी सांगितले.












