समर्थ नगरी परिवाराचा उपक्रम – अक्कलकोट
अक्कलकोट (प्रतिनिधी) – श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट आगमनदिनानिमित्त समर्थ नगरी परिवाराच्या वतीने यंदा शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी ललित पंचमीच्या दिवशी राज्यभर एकत्रित नामस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५.२५ वाजता होणाऱ्या या सोहळ्यात विश्वशांती व मनशांतीचा संकल्प साधण्यासाठी सर्व स्वामीभक्तांनी आपल्या गावी सामूहिक नामस्मरणात सहभागी व्हावे, असे आवाहन समर्थ नगरी अध्यात्मिक समितीचे कार्याध्यक्ष गणेश पाठक यांनी केले आहे.
समर्थ नगरीच्या वतीने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे व वे.शा.सं. अण्णू महाराज (चोळपा महाराज वंशज) यांच्या मार्गदर्शनाखाली नामप्रसार परिक्रमा पार पडली. त्यानंतर ललित पंचमी एकाच दिवशी, एकाच वेळेस नामस्मरणाच्या माध्यमातून साजरी करण्याचे नियोजन निश्चित झाले.
अक्कलकोटमध्ये मुख्य सोहळा
अक्कलकोट येथे श्री विठ्ठल मंदिर ए-वन चौक अथवा पावसाच्या नियोजनानुसार लोकापूरे हॉल, यलम्मा देवी मंदिर शेजारी मुख्य सोहळा होईल. सकाळी ११ वाजता स्वामींचे सोलापूर रोडवर स्वागत करण्यात येईल. सायंकाळी ५.२५ वाजता राज्यभरातील भक्त एकाचवेळी नामस्मरण करणार आहेत.
राज्यभरातील नियोजन
या दिवशी सोलापूर, बार्शी, सांगोला, इंदापूर, मिरज-सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पनवेल, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर यांसह कर्नाटकातील गुलबर्गा, बेळगाव, बेंगळुरू तसेच राजस्थानमध्येही नामस्मरण सोहळ्यांचे आयोजन केले आहे.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी महिला अध्यात्मिक समितीच्या सुखदा ग्रामोपाध्ये, अश्विनी शिंपी, कावेरी धरणे, दीपा कोकणे, मनीषा जाधव आदींसह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
– श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने विश्वशांतीसाठी हा सामूहिक नामस्मरण सोहळा भक्तांसाठी एक भाग्याचा दिवस ठरणार आहे.












