कातकरी पालकांनी आपला आहार व स्वच्छता राखल्यास निरोगी आरोग्य लाभेल.– अक्षता बुचडे
अंगणवाडी– खैराट मध्ये प्रशासनाचा पोषण महा उपक्रमाला चांगला प्रतिसाद !
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी –– मागासवर्गीय कातकरी समाजामध्ये पालक– पाल्यांमध्ये स्वच्छता आणि पोषण आहाराविषयी जागृती करावी. तसेच त्यांचे याबाबतचे विचार समजावे, याकरिता प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे अंगणवाडी सैराट प्रशालेत पोषण महा उपक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शन फोंडा बीटच्या मुख्य सेविका सौ. स्नेहा सामंत आणि सौ. अक्षता बुचडे यांनी केले.
या उपक्रमाबाबतची माहिती व सूत्रसंचालन सौ. मानसी सावंत यांनी केले. सौ. विद्या मस्कर यांनी पोषण गीतातून महत्व विशद केले. विशेषतः मागास कातकरी कुटुंबातील तसेच अनेक पाल्यांच्या महिला, स्वच्छता आणि पोषण आहाराबद्दल अनभिज्ञ असतात. त्यामुळे आपल्या घराची– परिसराची स्वच्छता आणि पाल्याच्या पोषण आहाराकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास आपला परिसर आणि पाल्याचे आरोग्य सुदृढ होऊन, समाज सुधारणा होईल असे मार्गदर्शक विचार सौ. स्नेहा सामंत यांनी व्यक्त केले .तर योग्य पोषण आहार आणि स्वतःच्या परिसराची, शरीराची योग्य स्वच्छता करणे गरजेचे आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांनी आपापल्या भागाकडे लक्ष देऊन, आपला प्रभाग सक्षम करावा. असे विचार यावेळी सौ अक्षदा बुचडे यांनी काढले. याप्रसंगी सकस पोषण आहाराचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते. त्यामुळे कातकरी समाज पालक महिला सजग झाला.रक्तवृद्धी, लसीकरण, डायरिया इत्यादी विषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविका स्वाती रासम, कविता सावंत, सीमा रेवडेकर, सुलभा लाड, सुजाता भालेकर, ललिता जाधव, अश्विनी येरम, सायली कदम, वनिता वारंग, प्रणाली पवार, प्राची उरणकर, प्रिया कामतेकर, वर्षा वायंगणकर, माया मेस्त्री, मनस्वी सावंत यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाला वाडीवरील कातकरी समाजातील आणि इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या…











