चिपळूणात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त २००हुन अधिक जणांचे रक्तदान

चिपळूण:- भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण भाजपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे २०० हुन अधिक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेतला होता.यावेळी भाजप नेते प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व पदाधिकाऱ्यांनी केक कापून प्रदेशाध्यक्ष आम.रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करत चिपळूण भाजपच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

 

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आम. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नेते तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण भाजपकडून शनिवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चिपळूण शहरातील श्री हॉस्पिटल येथे आरोग्य शिबीराचे उदघाटन भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व भाजप नेते प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ.अभिजित सावंत, डॉ.विक्रमसिंह पाटणकर यांच्यासह वैद्यकीय टीम कडून रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी तसेच योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य शिबीराला मोठी गर्दी झाली होती.

 

तसेच शहरातील शिक्षक पतपेढी इमारत सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण भाजपकडून करण्यात आले होते. येथे रक्तदान करण्यासाठी सकाळपासूनच रक्तदात्यांची गर्दी झाली होती. या शिबिरात २०० हुन अधिक रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. रेडक्रॉस व डेरवण रुग्णालयाच्या माध्यमातून हे रक्तसंकलन करण्यात आले.

 

या संपूर्ण कार्यक्रमाला भाजप नेते प्रशांत यादव यांच्या बरोबर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत,जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले, संगमेश्वर दक्षिण तालुका मंडळ अध्यक्ष रुपेश कदम,संगमेश्वर उत्तर मंडळ अध्यक्ष विनोद म्हस्के, सेवा पंधरावडा संयोजक विनोद भोबसकर, चिपळूण शहर अध्यक्ष शशिकांत मोदी, चिपळूण महिला मोर्चा शहराध्यक्ष रसिका देवळेकर, माजी सभापती सुभाष नलावडे, माजी नगरसेवक विजय चितळे, उद्योजक दत्ताराम लिंगायत, तेजस शिंदे, दक्षिण जिल्हा चिटणीस सौ. प्रणाली सावर्डेकर, वैशाली निमकर, माजी सभापती रामदास राणे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दिपा देवळेकर, अनवर जबले, यांच्यासह भाजपचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नीटनेटके शिस्तबद्ध आयोजन

आरोग्य तसेच रक्तदान शिबिराचे अत्यंत नीटनेटके व शिस्तबद्ध नियोजन वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ.स्वप्ना यादव यांनी केले होते. तरुणांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून प्रत्येकाकडे जबाबदारी वाटून देण्यात आली होती. रक्तदात्यांना दिला जाणारा आहार, तसेच उपस्थितांसाठी स्नेहभोजन,आणि आरोग्य पथकासाठी व्यवस्था अशी सुंदर आखणी करण्यात आली होती. सौ. यादव यांच्या या नियोजनाचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी देखील तोंडभरून कौतुक केले.

प्रशांत यादव यांच्यामुळे भाजपची ताकद वाढली-राजेश सावंत

प्रशांत यादव भाजपच्या प्रवाहात सामील झाल्याने भाजपची ताकद दुपटीने वाढली आहे.त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे.आणि सर्व कार्यकर्ते मेहनत घेऊन काम करणारे आहेत. जिल्हास्तरावरील रक्तदान शिबिर प्रशांत यादव यांनी आग्रहाने चिपळूणमध्ये घेतले आणि ते उत्तमपद्धतीने यशस्वी देखील करून दाखवले. पुढील काळात प्रशांत यादव यांचे नेतृत्व रत्नागिरी,राजापूर व संपूर्ण जिल्हाभरात आम्हाला मिळेल आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला प्रथम क्रमांकावर आणू असा विश्वास जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकांच्या सेवेसाठी कार्यक्रम-प्रशांत यादव

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आम.रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाकडून सेवा पंधरावडा अभियानाची घोषणा करण्यात आली आणि या अभियानात सर्व कार्यक्रम हे लोकांच्या सेवेसाठी तसेच लोकांपर्यंत पोहचण्यासाठी देण्यात आले आहेत. असे लोकसेवेचे शिस्तबद्ध कार्यक्रम फक्त भाजपमध्येच राबवले जातात,अन्य कुठेही मी पाहिलेले नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ता लोकांपर्यंत पोहचेल आणि पक्षाची ताकद वाढेल. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाचे कार्यक्रम प्रामाणिकपणे राबवावे असे आवाहन प्रशांत यादव यांनी यावेळी केले.