वडिलांसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या युवतीचा अपघातात मृत्यू

चिपळूण : सावर्डे ते वहाळ मार्गावरील तुरंबव फाटा येथे झालेल्या अपघातात दुचाकीवरील १६ वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रिया नीलेश नाचरे (१६, रा. निवळी लाखणवाडी) असे मृत मुलीचे नाव आहे.

 

ही घटना ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत जीप चालक प्रशांत पंडित (५०, रा. तुरंबव सहाणवाडी) यांनी सावर्डे पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादीत म्हटले आहे की, ते मांडकी ते तुरंबव या मार्गावर जीप (क्र. एम.एच. ०८ – ९६२८) घेऊन जात असताना समोरून आलेल्या दुचाकीने (क्र. एम.एच. ०८ – ३६८१) जीपला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील मागे बसलेली रिया नाचरे गंभीर जखमी झाली. तिला तातडीने डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी सात वाजता तिचा मृत्यू झाला.

 

या अपघातात दुचाकी चालक नीलेश नाचरे (वय ४५, रा. निवळी लाखणवाडी) यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी सावर्डे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.