खेड (राकेश कोळी) – कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वैभव मिळवून देणारे खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा आज औपचारिकरित्या भाजपात पक्ष प्रवेश होणार आहे. यासाठी कोकणातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. गेली तीस वर्षे सातत्याने राजकारणात कार्यरत राहून मनसेला खेडसह कोकणात मजबूत उभारी देणारे खेडेकर अखेर भारतीय जनता पार्टीच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहेत.
मुंबईतील नरिमन पॉईंट येथील पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन तसेच कोकणचे संघटक नितेश राणे यांच्या भक्कम पाठबळामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खेडेकर म्हणाले की, “मनसेतून बडतर्फ झाल्यानंतरही आम्ही थांबलो नाही. नितेशजी राणे खेडमध्ये आले, त्या दिवसापासूनच आम्ही भाजपाचे काम सुरू केले होते. आज होणारा पक्षप्रवेश हा फक्त औपचारिक भाग आहे. खरं तर आम्ही आधीपासूनच भाजपात मनाने आणि तनाने सामील झालो आहोत.”
कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीमुळे पक्षप्रवेश सोहळ्याला जल्लोषाचे स्वरूप आले होते. “कोकणात मनसेला वैभव मिळवून देणारे वैभव खेडेकर आज भाजपाच्या अथांग सागरात सामील झाले असून, हा सागर आम्ही सरोवरात रूपांतरित करू,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
वैभव खेडेकरांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपला कोकणात नवे बळ मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. मनसेच्या पायाभरणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि कोकणात कार्यकर्त्यांचा मोठा गट उभा करणारे वैभव खेडेकर यांचा भाजपात प्रवेश हा कोकणातील राजकीय समीकरणे बदलवणारा ठरू शकतो.












