दापोलीत अमली पदार्थ प्रकरणात तिसऱ्या आरोपीला अटक

दापोली | प्रतिनिधी :

दापोली पोलिसांनी समुद्रकिनारी सापडलेल्या अमली पदार्थ प्रकरणात कारवाईचा वेग कायम ठेवीत केळशी येथील तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे.

 

१५ सप्टेंबर २०२५ रोजी केळशी समुद्रकिनारी अज्ञात अमली पदार्थ आढळून आल्यानंतर गुन्हा क्र. १४३/२५ अंतर्गत एनडीपीएस कायद्यान्वये चौकशी सुरू होती. यापूर्वी अखिल होडेकर (वय ४९, रा. उंबरशेत, केळशी) आणि अब्रार डायली (वय ३२, रा. केळशी किनारा मोहल्ला) या दोघांना अटक झाली होती.

पोलिस चौकशीतून समोर आले की, अखिल होडेकरकडे एकूण सहा पिशव्या होत्या. त्यातील एक पिशवी मसुद बदुद्दीन ऐनरकर (वय २९, रा. दापोली) याला विक्रीसाठी दिली होती, तर एक पिशवी अब्रार डायलीकडे होती. पुढील तपासात ताबिश महमूद डायली (वय ३०, रा. किनारा मोहल्ला, केळशी) हा देखील या प्रकरणात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. चरस विक्रीत त्याने अब्रारला मदत केल्यामुळे २१ सप्टेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली.

या प्रकरणातील ठाणे येथे अटक झालेल्या मसुद ऐनरकर याला देखील लवकरच दापोली पोलिसांच्या ताब्यात घेण्यात येणार आहे. सध्या पोलिसांकडे चरसच्या पाच पिशव्या जप्त झाल्या आहेत. तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याची माहिती दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी दिली.

समुद्रकिनारी कुठल्याही संशयास्पद हालचाली, पॅकेट्स किंवा वस्तू दिसल्यास त्वरित दापोली पोलिसांना कळवावे, तुमची माहिती गुप्त ठेवली जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

दापोली पोलिसांच्या दक्षतेमुळे या प्रकरणात सलग तिसरी अटक होत अमली पदार्थविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.