सामाजिक कार्यकर्ते शांताराम भुरवणे यांचे निधन

देहदानाचा निर्णय; सामाजिक क्षैक्षाणिक, सहकार क्षेत्रात त्यांच्या कार्याची अमीट छाप

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व तेर्ये गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते शांताराम भुरवणे यांचे कोल्हापूर येथे गुरुवार दि. १८ रोजी मध्यरात्री २ वाजता आकस्मिक निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक आणि सहकारी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

कै शांताराम भुरवणे ‘भाई’ या नावाने परीचित होते. बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था जडणघडणीत श्री. भुरवणे यांनी अमूल्य योगदान दिले आहे. शांताराम भुरवणे हे संयमी, विवेकी, कार्यतत्पर आणि समाजकार्याला वाहुन घेतलेले असे व्यक्तिमत्त्व होते. संस्थेच्या कार्यात त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहणारे आहे. एक बहुआयामी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असलेले शांताराम भाई यांचे सामाजिक बांधलकी जोपासत सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम सुरुच होते. बँक ऑफ इंडियामधुन ते अधिकारी पदावरुन काही वर्षांपुर्वी निवृत्त झाले होते. गेल्या तीन दशकांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट संघटक म्हणून ते काम करत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अखिल भारतीय समिती सदस्य म्हणून कोणताही गाजावाजा न करता काम केले. पत्रकार विलास होडे यांच्या सहकार्याने त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केला. या समितीमध्ये सलग अनेक वर्षे काम करुन समाजातील अनिष्ठ प्रथा व रुढी परंपरा कायम स्वरुपात नष्ठ करण्यासाठी त्यांनी सामाजिक व शैक्षणिक असे प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले. प्रवोधन करताना कोणताही वाद विवाद न करता सर्वसामान्याना समजेल रुचेल या विचाराने श्रद्धा व अंधश्रध्दा यामधील फरक त्यांनी समाजावून सांगितला.

संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढ़ी मुबई या हिरक महोत्सवी पतपेढीचे क्रियाशिल सभासद म्हणून त्यांनी काम पाहीले. त्यांच्या कार्यशील योगदानाबाबत त्यांच्या सहकारी संचालकांसह बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गुणवंत सभासद म्हणुन गौरविण्यात आले होते. कारभाटले हायस्कूल सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. सध्या ते बुरंबी शिक्षण संस्थे मध्ये उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे दादासाहेब सरफरें विद्यालय व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय संगमेश्वर देवरुख मुख्य मार्गावर सुरु असून संस्था व शाळा प्रगतीसाठी सर्व संचालकांसह त्यांनी नेहमी सहकार्य व मार्गदर्शन केले. बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत असतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकी स्विकारून सहकार आणि सामाजिक कार्यकर्ते अशी दुहेरी भूमिका निभावली. कसबा, पाली आणि रत्नागिरी येथे शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत असताना अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी पिक पाणी कर्ज योजना राबविण्यात पुढाकार घेतला. विशेषत: आंबा फवारणी खर्च योजना मोठ्या प्रमाणात राबवली. शेती विषयक कर्ज उचल झाल्यानंतर त्या कारणासाठीच त्याचा कर्जदाराने विनियोग केला किंवा कसे याची ते प्रत्यक्ष पाहणी करीत असत. स्वतःच कोकणाकडे ओढ असल्याने त्यांनी मुंबई सारख्या शहराचा मोह सोडून संगमेश्वर नजीक असलेल्या त्यांच्या तेर्ये बुरंबी गावी वास्तव्यास येऊन त्यांनी तेथे आंबा, नारळ बागायतीची लागवड करुन अधिकारी म्हणून डामडौल न दाखवता शेतीमध्ये लक्ष देत नारळांवर काळीमीरी सारखे जोडपीक घेऊन आपल्यातला खरा शेतकरी त्यांनी सर्वांसमोर आणला.
नुकताच त्यांच्या चिरंजीवाने निर्मिलेला व दिग्दर्शन केलेला पारीजात हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. याच्या प्रिमियर शो प्रदर्शनावेळी एक मार्गदर्शक वडील आणि मित्र हे नाते त्यांच्यामध्ये आम्हास अनुभवांस मिळाले. या चित्रपटांतुनही शहराकडून आपल्या गावाकडे पहा. असा साधा सोपा संदेश पोहचविला गेला. सहकार चळवळ ग्रामीण भागात राबविण्यात ते अग्रभागी होते. एका पतसंस्थेचे संस्थापक होते. सध्या संगमेश्वर तालुका कुणबी पतसंस्था च्या ग्रामीण शाखेत मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. ८०- ९० च्या दशकात आपल्या गावात दारू बंदी झाली त्यामध्ये अग्रभागी भाई होते. मातृमंदिर संस्थे मध्ये शक्य होईल तेवढा वेळ देऊन सामाजिक आणि सहकारी योजना मध्ये सहभागी होत असत. श्री. भुरवणे यांचे कार्य त्यांच्या संयमित आणि तळमळीच्या वृत्तीमुळे कायम लक्षात राहील. त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा अंत्यविधी नाकारता देहदानाचा निर्णय घेतला असून त्यांनी डेरवण येथील वालावलकर रूग्णालयास त्यांचा देहदान केला आहे. आज शांताराम भाईंची बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था चालवित असताना आम्हास त्याची उणीव सदैव जाणवत राहणार आहे. ‘शांताराम भाई’ ही आठवण सदैव असणार आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. व बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था व बुरंबी पंचक्रोशीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!