उत्कृष्ट कामगिरीमुळे पुन्हा निवड; अभिनंदनाचा वर्षाव
खेड (प्रतिनिधी)-
खेड तालुक्यातील भरणे गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सुनिल गणपत भुवड यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यापूर्वी सन २०१६ ते २०२० या कार्यकाळात भुवड यांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. त्यांच्या कार्यकाळात गावातील विविध तंटे सामंजस्याने सोडवून गावात सलोखा व शांततेचे वातावरण राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले होते.
याच उल्लेखनीय कामगिरीमुळे गावकऱ्यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत अध्यक्षपदी त्यांची निवड केली. निवडीनंतर भावना व्यक्त करताना सुनिल भुवड म्हणाले की, “गावातील सर्वांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. गावाच्या विकासासाठी आणि तंटामुक्त समितीच्या कामकाजासाठी सर्वांना सोबत घेऊन चालणार असून गावाने दाखविलेला विश्वास कधीही तडा जाऊ देणार नाही.”
सुनिल भुवड यांच्या पुनर्निवडीमुळे भरणे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निवडीच्या वेळी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सरपंच संतोष गोवळकर, माजी सरपंच राजाराम बैकर, आत्माराम भुवड, संदिप खेराडे, आप्पा घोले, दिपक बैकर, अनंत घोले, प्रकाश फागे, श्रीदेवी काळकाई मंदिराचे अध्यक्ष महेश जगदाळे, सचिव प्रशांत चव्हाण यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सुनिल भुवड यांच्या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.











