खेड (प्रतिनिधी) – नवरात्रोत्सव हा आनंद, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा सण आहे. या सणात समाजातील गोरगरीब कुटुंबांतील मुलींनाही सामील करून घेण्याचा सुंदर उपक्रम लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने हाती घेण्यात आला.
मंगळवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने समाजातील वंचित घटकातील मुलींना नवीन ड्रेस वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. या उपक्रमासाठी प्रियांका कलेक्शनचे मालक ला. प्रवीण प्रजापती यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या वतीने श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल, खेड येथील विद्यार्थिनी कु. जिया संतोष तांबिटकर (सुसेरी नं. १) आणि कु. श्यामली रामदास माळी (नांदगाव) या दोघींना नवीन ड्रेस भेट म्हणून देण्यात आले.
या वेळी लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर प्रमुख व माजी अध्यक्ष ला. रोहन विचारे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी व माजी अध्यक्ष ला. सुरेश चिकने, ला. अनिल मोरे, ला. उत्तम कांबळे यांसह लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
नवरात्रोत्सवाचा आनंद प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा, विशेषतः गरजू मुलींनाही या सणात सहभागी होण्याची संधी मिळावी, या हेतूने करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने घेतलेला हा उपक्रम सामाजिक जाणिवेचे आणि सेवाभावी वृत्तीचे उत्तम उदाहरण ठरला आहे.












