चिपळुणातील रॅलीत गगनभेदी घोषणा
शहर स्वच्छतेची विद्यार्थी, नगर परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
चिपळूण (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या स्वच्छता ही सेवा मोहिमेंतर्गत मंगळवारी शहरात स्वच्छता रॅली काढण्यात आली. यावेळी ‘स्वच्छतेचे करुया पालन, उजळून जाईल अवघे जीवन’ अशा अनेक घोषणा देत ‘मी कायम शहर स्वच्छ ठेवीन’ अशी शपथ विद्यार्थी व नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली. स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्र शासनाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ही मोहीम राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याच्या जागरुकतेसाठी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली परांजपे मोतीवाले हायस्कूल ते नगर परिषद कार्यालय अशी रॅली काढण्यात आली.
यावेळी ‘प्लास्टिकचा वापर टाळा, प्रदूषण दूर करा, प्लास्टिकचा वापर धोक्याचा’ अशा अनेक घोषणा देण्यात आल्या. यावेळी ‘स्वच्छता माझा धर्म आहे. या धर्माचे पालन करणे माझे आद्यकर्तव्य आहे. माझ्या घराचे व शाळेचे आवार स्वच्छ ठेवणे ही माझी जबाबदारी असून ती मी पार पाडेन. मी स्वतः घाण करणार नाही, करू देणार नाही. कचराकुंडीचा योग्य वापर करेन. माझ्याकडून जल, ध्वनी, वायु प्रदूषण होणार नाही याची मी काळजी घेईन’ अशी शपथ घेण्यात आली. तसेच नगर परिषद कार्यालयातील समारोपात परांजपे हायस्कूलचे शिवाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. रॅलीत प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य निरिक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, नगर रचना विभाग प्रमुख नम्रता खैरमोडे, प्रज्ञा गमरे, नगर अभियंता दीपक निंबाळकर, अंतर्गत लेखा परिक्षक अवधूत बेंद्रे, लेखापाल शिल्पा शेटे, अग्निशमन अधिकारी आनंद बामणे, संगणक विभाग प्रमुख निवेदिता आंबेकर, विद्युत अभियंता संगीता तांबोळी, सभा अधीक्षक संतोष शिंदे, अभिलेख भांडार प्रमुख वलिद वांगडे, अतिक्रमण विभाग प्रमुख संदेश टोपरे, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर, परांजपे मोतीवाले हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊ कांबळे, शिक्षक शिवाजी शिंदे, विकास तांबे, मानसी टाकळे आदी सहभागी झाले होते.













