विशेष संपादकीय : पुतण्या मंत्रालयात, काका मैदानात

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर : पक्षात फूट पडणे किंवा बंडखोरी होणे हे शरद पवार यांना काही नवीन नाही. साठ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी स्वत: वसंतदादा पाटील, इंदिरा गांधी तर कधी सोनिया गांधी यांनाही मोठे आव्हान देण्याचे धाडस दाखवले होते. बॅ. ए. आर. अंतुले यांनी मुख्यमंत्री असताना पवारांच्या पक्षाचे ४० आमदार फोडले, तेव्हाही पवार खचले नाहीत व पुन्हा त्याहीपेक्षा जास्त निवडून आणले. १९७८ मध्ये शरद पवारांनी काँग्रेसच्या ४० आमदारांसह बंडाचा झेंडा फडकवून वसंतदादांचे सरकार पाडले. १९९९ मध्ये विदेशी जन्माच्या मु्द्द्यावरून त्यांनी पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांना बरोबर घेऊन काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकवला. बंडखोरी आणि धाडस हे पवारांच्या रक्तातच भिनले असल्याने आपल्या पुतण्याने केलेल्या बंडानंतर ते स्वत: डगमगले नाहीत. खचले नाहीत. सातारा जिल्ह्यातील कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांनी संघटना बांधणीला पुन्हा प्रारंभ केला. अजित पवार हे आज ना उद्या भाजपच्या सरकारमध्ये सामील होणार याची अनेक धुरिणांनी अटकळ बांधली होती. पक्षात फूट नसून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालो आहोत, असा यु्क्तिवाद अजितदादा व त्यांचे सहकारी करीत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच आहेत, अशीही ते पुस्ती जोडत आहेत. शरद पवार मात्र अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा नाही असे बजावत आहेत.

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीला दणका दिला. उद्धव ठाकरे यांना वर्षावरून थेट मातोश्रीवर परतावे लागले होते. यावर्षी अजित पवारांनी केलेल्या पराक्रमामुळे काकांना रस्त्यावर यावे लागले आहे. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे व चाळीस आमदारांनी उद्धव यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंड केल्यावर त्यांची गद्दार, डुक्कर अशी पक्षप्रमुखांनी व प्रवक्त्यांनी संभावना केली. पन्नास खोके-एकदम ओके असे हिणवले. मुंबईत कसे प्रवेश करता, बघून घेऊ… अशा धमक्या दिल्या. पवारांनी मात्र पक्षात उभी फूट पडल्यावरही आपला संयम ढळू दिला नाही. त्यांनी अजित पवार, प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्याविषयी कडक शब्दांत नाराजी प्रकट केली. पटेल, तटकरेंची पक्षातून हकालपट्टी केली पण त्यांना गद्दार म्हणून संबोधले नाही. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला त्यांना त्यांची जागा दाखवणार, असा निर्धार पवारांनी बोलून दाखवला आहे.

अजितदादा व त्यांचे तीस-पस्तीस समर्थक आमदार हे भाजपसोबत गेल्याने शरद पवारांना त्यांचा अजेंडा राज्यात केंद्रित करावा लागला. मोदी हटाव मोहिमेसाठी विरोधी पक्षांची राष्ट्रीय पातळीवर मोट बांधण्याच्या प्रयत्न करणाऱ्या शरद पवारांवर वयाच्या ८३ व्या वर्षी पक्ष वाचविण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावण्याची पाळी आली आहे. पन्नास वर्षांपूर्वी वसंतदादा पाटील यांना अंधारात ठेऊन पवारांनी त्यांचे सरकार पाडले व पुलोद स्थापन करून ते स्वत: मुख्यमंत्री झाले. आता त्यांच्या पुतण्याने त्यांना धोका देऊन उपमुख्यमंत्रीपद मिळवले व काकांपेक्षा आपला मार्ग वेगळा असल्याचे महाराष्ट्राला दाखवून दिले. १९७७ मध्ये काँग्रेस पक्षाची काँग्रेस आय व काँग्रेस यु अशी दोन गटांत विभागणी झाली होती. शरद पवार हे काँग्रेस युमध्ये होते. १९७८ मध्ये दोन्ही काँग्रेसने विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. २८८ पैकी जनता दलाला ९९ जागांवर विजय मिळाला. पण बहुमतापासून पक्ष दूर होता. इंदिरा काँग्रेसचे ६२ व काँग्रेस युचे ६९ आमदार निवडून आले. दोन्ही काँग्रेसने मिळून सरकार बनवले. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री व नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. तिरपडे हे त्यांच्या पद्धतीने काम करीत राहिले. असंतोष वाढत होता. एक दिवस शरद पवार दुपारी वसंतदादांना भेटले, थोडी फार चर्चा केली, मी निघतो, चुकले माकले, तर माफ करा म्हणाले…. पवार काय हेतूने बोलले ते दादांना समजले नाही. शरद पवारांनी ४० आमदारांसह बंड केले. समाजवादी, जनसंघ, डाव्या पक्षांना बरोबर घेऊन पुलोदचे सरकार स्थापन केले. वयाच्या ३८ व्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १८ जुलै १९७८ रोजी राज्याच्या सर्वोच्च पदाची शपथ घेतली. साडेचार महिन्यांचे वसंतदादांचे सरकार कोसळले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला हटविण्यामागे भाजपचा आराखडा होता याची कबुली स्वत: देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे. ठाकरे यांनी भाजपचा विश्वासघात केला म्हणून त्यांना धडा शिकवला यात भाजप हायकमांडचा मुत्सद्दीपणा होता. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ५० आमदारांचा ताफा आता भाजपच्या साथीला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीशी १७० आमदार असताना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेण्याची गरज का लागली, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. अजित पवारांनी गेल्या साडेतीन वर्षांत तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २०१९ मध्ये प्रथम फडणवीस यांच्याबरोबर, नंतर ठाकरे यांच्याबरोबर आणि आता शिंदे यांच्याबरोबर. आजवर ते पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. यावेळी ते केवळ उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानण्यासाठी आले आहेत का?

राष्ट्रवादीच्या चार-पाच नेत्यांवर ईडी व अॅन्टी करप्टनच्या चौकशा चालू आहेत. ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झालेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचारी म्हणून आरोप झाले ते आता सरकारचे भाग झालेत. ही तडजोड आहे की सौदेबाजी? दि. २७ जूनला मध्य प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार व परिवार वादावर सडकून टीका केली. राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी पक्ष म्हणून संबोधले. ७० हजार कोटींचा घोटाळा केला असा उल्लेख केला. मग आठ दिवसांत असे काय घडले. त्या पक्षातले नऊ नेते सरकारमध्ये मंत्री म्हणून आले?

प्रफुल पटेल म्हणतात, पक्षाच्या ५४ पैकी ५१ आमदार गेल्या वर्षापासून म्हणत आहेत की, आपण भाजपसोबत जाऊ या, बहुसंख्य आमदारांच्या भावना पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना समजल्या नाहीत का? आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार, पाहिजे तर लिहून देऊ का? असा प्रश्न अजितदादांनीच पत्रकारांना विचारला होता, मग त्यांच्या विचारात एकदम बदल व्हावा असे काय घडले?

ठाकरे सरकारमध्ये असताना शिवसेनेच्या आमदारांना त्यावेळचे अर्थमंत्री अजित पवार हे विकासासाठी निधी देत नव्हते, असा आरोप करून एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांनी उद्धव यांच्याविरोधात उठाव केला, आता तेच अजित पवार शिंदे-फडणवीसांसोबत सरकारमध्ये बसणार आहेत. आता शिंदे काय करणार?

देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले होते की, केवळ आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष केला. या पक्षाची युती कदापी शक्य नाही. आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, नाही म्हणजे नाही, राष्ट्रवादीशी कदापी युती नाही, नाही नाही… अजित पवारांना तर भाजपचे दरवाजे बंद आहेत, तेही कधी इकडे येणार नाहीत. (बहुधा परिस्थिती बदलली असावी) नेटकरी म्हणतात-महाराष्ट्रातील कोणाचेही मत वाया गेले नाही, ज्याला ज्याला मत दिले, त्या सर्वांनी सरकार बनवले…. अजित पवारांबरोबर गेलेले आमदार नाराज आहेत असे म्हणतात, कारण आम्हाला सुरत, गुवाहटी किंवा गोवा कुठेच नेले नाही…. काय ती झाडी, काय ते डोंगर आम्हाला बघायला मिळाले नाही…

पुतण्याने काकांच्या विरोधात केलेल्या बंडानंतर शालिनीताई पाटील यांनीही प्रतिक्रिया देऊन आपला हिशेब चुकता केलाय. त्या म्हणतात, पन्नास वर्षांपूर्वी ज्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना जो काही त्रास झाला असेल तो स्वत:ला कसा होतो, हे शरद पवारांना अनुभवायला मिळेल. नियतीचा नियम असून जे पाप केले, ते इथेच फेडावे लागते…. एकनाथ शिंदे यांच्या गटावर आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरले, आमचा बाप चोरला असे आरोप मातोश्रीकडून झाले. आता अजितदादांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर अजून कोणी आमचा पुतण्या चोरला, असा आरोप केल्याचे ऐकायला

मिळाले नाही….

[email protected]

[email protected]