जिल्ह्यात राबविण्यात आलेली शिक्षकांची आंतर जिल्हा बदली प्रक्रिया चुकीची झाली असल्याने जिल्ह्यातील तब्बल ११४ शाळांमध्ये एकही शिक्षक नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. याला नेमके कोण जबाबदार आहे व कोणाचे धोरण चुकले याचे आत्मपरीक्षण संबंधितांनी करावे करावे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल गेली तेरा वर्षे राज्यात प्रथम येत असून देखील शिक्षकांची समस्या उद्भवल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती ही यावेळी राजन तेली यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात व अन्य क्षेत्रातही पर जिल्ह्यातून येणारे अधिकारी तसेच कर्मचारीही परत जाण्याच्या तयारीतच येत असतात. त्यामुळे त्यांच्या नेमणुका करताना किमान पाच वर्षे बदली मिळणार नाही अशा प्रकारचे धोरण ठरविणे आवश्यक आहे. तसेच रिक्त जागांची समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे असे प्रयत्नही होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.