घड्याळाचे काटे उलटे फिरतात…!

घड्याळाचे काटे उलटे फिरतात…!

लबाडा घरच आवतण

माझे कोकण….. संतोष वायंगणकर

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेना-भाजपाचे सरकार स्थापन झाले त्याला एकवर्ष पूर्ण झाले. महाविकास आघाडी सरकारला अडीचवर्षे पुर्ण झाल्यावर तत्कालिन मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या पक्षातून आणि मित्रपक्षाचे ४० आमदारांनी शिवसेना सोडली आणि भाजपाला पाठींबा देत शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. या एकावर्षात शिंदे-फडणवीस सरकारने अतिशय चांगले लोकाभिमुख निर्णय घेतले. वर्षभरानंतर येणाऱ्या निवडणुकांमुळे असेल परंतु काही निर्णयांमुळे सर्वसामान्य जनतेला लाभ मिळू शकला. यामुळे सर्वकाही ठिक चाललय. न्यायाचे निर्णय, विधानसभा अध्यक्षांचे निर्णय हे सर्व रूटीनप्रमाणे होतं. रहाणाऱ्या गोष्टी आहेत. मात्र, आता सर्वकाही ठिक आहे. असं वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच थेट सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. रविवार असल्याने अनेकांचा सुट्टीचा, आरामाचा दिवस. यामुळे शेतकरी वगळता संपूर्ण महाराष्ट्र संडे मूडमध्ये होता. मिडियामधल्या विश्वसनिय सूत्रानाही कोणतीही खबर लागू न देता राजभवनावर राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्यासह नऊजणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि अखंड महाराष्ट्र राजकारणात काहीही घडू शकते. या एकाच वाक्याच्या चर्चेचे गुऱ्हाळ करत बसला. कोकणात तर राजकिय गजाली चहा-भजी खाताना अशा काही रंगतात की, क्षणभर असं वाटावं या देशाचे पंतप्रधान काय करणार, काय बोलणार हे इथल्या लोकांना अगोदरच माहित असत. असा समज करूनच तशा ‘गजाली’ केल्या जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सहमतीनेच हे सर्व घडलय यावरही खुप मोठी चर्चा महाराष्ट्रात होत आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे राजकारण आणि राजकिय इतिहास समोर आणला तर त्यांच्या संबंधी जनतेमध्ये विश्वासापेक्षा अविश्वास अधिक असल्याचे दिसून येईल. ‘पवारसाहेब, काहीही करू शकतात’ या एका वाक्यातच सर्वकाही आलेलं आहे. माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळात बंडखोरी करून शरद पवार बाहेर पडले. पुलोदची स्थापना केली. त्या राजकिय उलथा-पालथीला ‘विश्वास घाता’ चीच किनार होती. नंतरच्याकाळात शरद पवार यांनी तो विश्वासघात नव्हता तर ती राजकिय अपरिहार्यता होती असं सांगण्याचा प्रयत्न पवारप्रेमी ज्येष्ठांनी सांगण्याचा जरूर प्रयत्न केला. परंतु ती घटना जनता जशी विसरली नाही तशी शरद पवार यांनाही ती जखम घेऊनच राजकिय प्रवास करावा लागत आहे. आजही पुलोदचे मुख्यमंत्रीपद त्यांना टोचणी लावत आहे. फोडा-फोडीच्या राजकारणाला बेरजेचे राजकारण हा शब्दप्रयोगही राजकारणामध्ये शरद पवार यांनीच आणला. गेल्याकाही वर्षात फोडाफोडी म्हणजेच राजकारण असा रूढार्थाने शब्द वापरला जाऊ लागला. काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची निर्मिती हा देखिल याच कुटनितीचाच तो भाग होता. फक्त प्रत्येकवेळी थोड्या वेगळया पद्धतीने ही कुटनिती वापरली गेली. महिन्याभरापूर्वीच शरद पवार यांनी राजकारणातून थांबण्याचा निर्णय जाहीर केला. आणि दोन दिवसात कार्यकर्त्यांच्या अति आग्रहामुळे पुन्हा सक्रिय होत असल्याचे जाहीर केले. त्या आठवड्याभरातील राष्ट्रवादीच्या सभा, बैठका, पत्रकार परिषदा यातून नक्कीच काहीतरी घडतय याची चर्चा महाराष्ट्रभर होत होती. त्यातच अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि खा. सुप्रिया सुळे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते अजितदादाना पक्षीयस्तरावर कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नसल्याने सहाजिक त्यांनी नाराजी पक्षाच्या एका मेळाव्यात जाहिरपणे बोलून दाखवली होती. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ही खरी की खोटी फुट यातली सत्यतेवर आजही लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. शरद पवार यांनी अतिशय नियोजन पद्धतीने शिवसेना संपवली. हे ज्यांना राजकारण कळतय तो नाकारूच शकणार नाही. काही वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश आकोलकर यांनी ‘लबाडा घरच आवतण’ या शिर्षकाखाली पंचवीस वर्षापूर्वी लिहिलेला लेख माझ्या वाचनात आला होता. त्या लेखामध्ये शरद पवार त्यांच्या मनातल. त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांना तरी काही सांगत असतील का ? अशी शंकाच व्यक्त केली होती. इतका कोणालाही कोणत्याही गोष्टीचा थांगपत्ता लागू न देता राजकारण करण्याची शरद पवार यांची ‘स्टाईल’ फारच अलग आहे. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा पराभव लातूरमध्ये करण्यासाठी शिवाराव पाटील यांना निवडणुकीत जनतादलातर्फे उभे करून स्व. साथी किशोर पवार यांना सोबत घेत व त्यांनी स्व. विलासराव देशमुख यांचा पराभव घडून आला. अर्थात आता पाणी बरच वाहून गेलय. सारे राजकिय संदर्भ बदलले आहेत. दस्तुरखुद्द बारामतीत जुने-जाणते शरद पवार यांच्यासोबत आहेत. तर नविन तरूण पिढी मात्र अजितदादा पवार यांच्याशी जोडलेली आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या खेळाची मांडणी शरद पवार यांनी काहीवर्षे केली. आजच्या राजकारणात हा पुढचा अध्याय आहे. इतकेच. सध्या तर राजकारणाविषयी मोठ्या प्रमाणावर मतमतांतरे मांडली जात आहेत. नैतिकता, विश्वासार्हता, अविश्वास, फोडा-फोडी, फसवणुक या सर्वांची बांधलेली मोट म्हणजे राजकारण असा समज समाजमनामध्ये रूढ होत चालला आहे. खरंतर महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गोवा राज्याच्या राजकारणात नेहमीच अस्थिरता असायची. स्व. मनोहर पर्रीकर यांनी ही अस्थिरता संपवली. आणि विद्यमान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तर गोव्यात विरोधक कोण हे शोधावे लागतील अशी स्थिती निर्माण केली. राजकारण काहीही आणि कसही असल तरीही भविष्यात निवडणुका होतील परंतु निवडून आल्यानंतर सत्तास्थापनेत निवडुन आलेले सर्वच सहभागी झालेतर आश्चर्य वाटायला नको. शेवटी सर्वांनाच ‘विकास’ करायचा आहे. मग विकासाच्या मुद्यावर एकत्र तर यावच लागेल ना… जनता सब जाणती है. !