मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीत ‘मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार

सावंतवाडी । प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीने ‘मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज’ अभियान अंतर्गत एका विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. या सभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमात ग्रामपंचायतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांचा गौरव केला. यामध्ये ग्रामपंचायतीचे पाणी कर्मचारी सिद्धेश मुरकर, प्रतीक नाईक, श्रीकृष्ण इन्सुलकर, आणि नंदू पालयेकर यांचा त्यांच्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

याशिवाय, वन्यजीव संरक्षणासाठी प्रयत्नशील असणारे सर्पमित्र उल्हास कोरगावकर, यशस्वी उद्योजक अविनाश कुंभार, आणि तालुक्यात प्रगतशील शेतकरी म्हणून प्रथम क्रमांक मिळवलेले बाळू मुळीक यांचाही सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरवण्यात आले.

या ग्रामसभेला सरपंच सौ. मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, अर्जुन मुळीक, स्नेहल मुळीक, कविता शेगडे, महेश शिरसाठ, मधुकर जाधव, गिरिजा मुळीक, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर आणि बंटी मुळीक, आदिशक्ती अभियान अध्यक्ष ज्योती शिरसाठ, तंटामुक्ती अध्यक्ष दर्शना शिरसाट यांच्यासह सी.आर.पी., अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, महिला आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमामुळे ‘पंचायत राज’ अभियानाबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली, असे दिसून आले.