चिपळूण (प्रतिनिधी)– : तालुक्यातील स्नेहबंध मंच तर्फे सुमिता शिर्के यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच नंदिनी कदम यांनी चिपळूण आगारामध्ये आगार वाहतूक निरीक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार कोंढे येथील रिगल कॉलेजच्या हॉलमध्ये करण्यात आला.
या कार्यक्रमाला स्नेहबंध चिपळूणचे अध्यक्ष सिताराम शिंदे, उपाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, सचिव विकास ढवन, मार्गदर्शक विनायक घटे, संचालक प्रकाश सावर्डेकर, विजय थोरे, पांडुरंग लकडे, नारायण खेडेकर, नसरीन खडस, अमिना मोमीन, प्राचार्य पूनम गुरव, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार आवळे, प्रा. अजिंक्य शिंदे, प्रबोध काळे यांच्या सह विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत कॉलेजच्या प्राचार्य पूनम गुरव यांनी केले. तर प्रास्ताविक विजय थोरे यांनी केले. सुमिता शिर्के या रीगल कॉलेजच्या संचालिका व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. त्याचबरोबर वाहतूक निरीक्षक नंदिनी कदम यांनी चिपळूण आगारामध्ये उल्लेखनीय काम करत आहेत म्हणून हा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमांमध्ये आपले मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष सीताराम शिंदे म्हणाले की, महिलांनी अशाच प्रकारे उत्तुंग भरारी घेणे ही काळाची गरज आहे. पहिल्या महिला ह्या चूल आणि मुल यामध्येच अडकल्या होत्या मात्र आत्ताची महिलांची प्रगती पाहून खरोखरच अभिमान वाटतो. आजची महिलांची यशस्वी घोडदोड पाहताना नक्कीच आनंद होतो केवळ चूल आणि मुल यामध्ये न अडखता महिला आता धैर्याने सर्व संकटांना सामोरे जात आपले धाडस दाखवत मोठमोठ्या हूद्द्यांवर पोहोचत असून आपली कर्तबगारी सिद्ध करत आहेत. अशाच प्रकारचे कार्य करणाऱ्या सुमिता शिर्के आणि नंदिनी कदम या महिला आम्हाला दिसून येतात त्यामुळे या दोन्ही महिलांचा सत्कार आज आमच्या मंचातर्फे करण्यात आल्याचे यावेळी शिंदे यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले. त्याचबरोबर महिला ह्या शूर आणि रणरागिनी देखील बनतात. कुठल्याही प्रसंगाला धाडसाने तोंड देतात. आणि संकटातून कुटुंबाला बाहेर काढतात. एखाद्या पुरुषाची पत्नी गेली तर अशावेळी पुरुष काय करतो काही दिवसाने बाहेर पडतो दुसरी पत्नी बघून करतो. मात्र, पतीच्या निधनानंतर महिला या हिमतेने पुढे येऊन आपला मोडलेला संसार उभा करते मुलांना वाढवते त्यांना शिक्षण देऊन मोठे करते, त्यांचाही संसार उभा करते याला धैर्य व धाडस म्हणतात. अशा महिलांचा समाजासमोर मोठा आदर्श निर्माण होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश सावर्डेकर तर आभार मंदार आवले यांनी मानले.












