सावंतवाडी । प्रतिनिधी : डोंबिवली येथील ख्यातनाम कवी आणि गझलकार विजय जोशी (विजो) यांना लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘वाङ्मय पुरस्कार – २०२५’ घोषित करण्यात आला आहे. वृत्तबद्ध कविता आणि गझल या विषयावर त्यांनी लिहिलेल्या ‘वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र)’ या पुस्तकासाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
कवी द्वारकानाथ शेंडे ‘मोक्षदा पुरस्कार’ या नावाने हा पुरस्कार विजो यांना देऊन सन्मानित करण्यात येईल. रोख पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चिपळूण येथे रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी एका समारंभपूर्वक कार्यक्रमात विजो यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
मूळचे मालवण तालुक्यातील बागायत येथील असलेले विजय जोशी हे साहित्य क्षेत्रात ‘विजो’ या नावाने ओळखले जातात. ते नामवंत कवी, गझलकार आणि विशेषत: काव्यगुरू म्हणून प्रसिद्ध आहेत. कवितेची आवड जपत असतानाच त्यांनी अनेक नवोदित कवींना वृत्तबद्ध कविता आणि गझल लेखनाचे सखोल मार्गदर्शन केले आहे.
विजो यांच्या साहित्यिक कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. त्यांच्या “बाया” या कवितेचा तब्बल ५६ जागतिक भाषांमध्ये अनुवाद करण्याचा विश्वविक्रम आहे. याव्यतिरिक्त, गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या त्यांच्या बालकविता संग्रहालाही अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या या नामांकित ‘वाङ्मय पुरस्कारा’चे मानकरी ठरल्याबद्दल कवी विजय जोशी (विजो) यांचे साहित्य वर्तुळातून आणि डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.










