घटस्फोटीत इसमाला लग्न जुळवून देण्याचे अमिष दाखवून उकळले १ लाख ८३ हजार रूपये

राजापूरातील घटना 

राजापूर | प्रतिनिधी: घटस्फोटीत इसमाला लग्न जुळवून देण्याचे अमिष दाखवून तब्बल १ लाख ८३ हजार रूपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजापूर तालुक्यातील डोंगर येथील मुबीन फकीर कालू याच्या विरोधात राजापूर पोलीस स्थानकात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली.

 

या प्रकरणी सज्जाद अब्दुलरेहमान मस्तान (५०, रा. डोंगर, मुसलमानवाडी) यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. सज्जाद हे घटस्फोटीत असून त्यांच्याच गावातील मुबीन फकीर कालू याने सबा शेख नावाच्या मुलीशी लग्न लाऊन देतो असे सांगून लग्नाच्या बोलणीसाठी १६ हजार रुपये व मुलीचे वडील आजारी असल्याचे सांगून ३४ हजार रुपये घेतले.

त्यानंतर मुलीचा नंबर असल्याचे भासवून मुबीन याने व्हॉटसअपद्वारे सज्जाद यांच्याशी चॅटींग करून नवीन ड्रेस व कपडे खरेदीकरीता वारंवार पैशाची मागणी करून गुगल पेव्दारे नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत तब्बल १ लाख ३३ हजार रूपये उकळले.

 

त्यानंतर मागील ३ वर्षापासून मुबीन कालू हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने अखेर सज्जाद यांनी राजापूर पोलीस स्थानकात मुबीन कालू याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुबीन कालू याच्या विरोधात भा.दं.वि. कलम ४१९, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.