खेडमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

खेड (प्रतिनिधी) :

हवामान विभागाने कोकणासाठी येल्लो अलर्ट जाहीर केला असून, शुक्रवारी रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहर व परिसरात मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. रात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस शनिवारी सकाळपर्यंत कायम राहिल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहर परिसरातील सखल भागांत पाणी साचले आहे. शहरातील वाहतुकीवर याचा परिणाम होत असून वाहनधारकांसह रस्त्यांवरून जाणाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या जगबुडी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. सध्या नदीची पाणीपातळी ४.८० मीटर इतकी झाली असून ती ५ मीटरच्या इशारा पातळीच्या अगदी जवळ पोहोचली आहे. तर धोका पातळी ७ मीटर आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खेड शहराला पुन्हा एकदा पुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता बाळगली असून नदीकाठच्या भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये, तसेच सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील काही दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.