राजमाता जिजाउ युवती संरक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ
रत्नागिरी : प्रतिनिधी : अलीकडे विशेषत: फेसबुक, इंन्स्टाग्रामचा आणि व्हॉटसअप स्टेटसचा वापर वैयक्तीक माहिती अपलोड करण्यासाठी करु नका. या माहितीच्या आधारेच सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, याला आळा घालायचा असेल तर सोशल मिडियाचा वापर सुरक्षितपणे करावा, त्याचा चांगला कामासाठी वापर कसा करता येईल यादृष्टीने प्रयत्न करावे सगळ्या जगाला आपल्या घरातील वैयक्तीक अपडेट सोशल मिडियाच्या माध्यमातून देवू नका असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा महिला,बालविकास विभाग यांच्या माध्यमातून आणि भारतीय स्त्री शक्ती संस्था, मिशन साहसी आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने येथील नवनिर्माण महाविद्यालयात राजमाता जिजाउ युवती संरक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, महिला बालविकास अधिकारी आर.बी.काटकर, नवनिर्माण कॉलेचच्या प्राचार्य आशा जगदाळे, नवनिर्माण शिक्षण संस्था संचालिका सिमा हेगशेट्ये, प्राचार्य नजमा मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर, भारतीय स्त्री शक्ती समुदेशक जान्हवी पाटील, क्रीडा शिक्षिका स्वप्नाली पवार आदी उपस्थित होते.
सोशल मिडियाचा चांगला वापर करणे योग्य आहे मात्र याचा नको तितका वापर मुलांवर मानसिक आघात करत आहे.यामध्ये पालकांचाही तितकाच समावेश आहे.सोशल मिडियावर चांगल्या गोष्टी टाकत जा, याचा गैरवापर करत मुली, महिला यांना ब्लैकमेल किंवा अन्य काही अनुचित प्रकार घडत आहे यामध्ये जागरुक राहावे असे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.
तर अगदी घरात आज स्पेशल काय आहे इथपासून आपण काय करतोय, काय खातोय, कुठे जातोय या सगळ्या गोष्टींचे अपडेट विशेषत: महिला वर्गाकडून सोशल मिडियावर टाकले जातात. त्यामुळे आपली वैयक्तीत आणि कुटुंबाची संपूर्ण माहिती काही ठिकाणी सेव्ह होत असते, हॅकर याचा वापर करतातच त्याशिवाय अन्य लोकांनाही आपल्या सगळ्या गोष्टी कळतात, हे वेळीच थांबवा अन्यथा अनेक गुन्हे यामाध्यमातून पुढे येत असल्याचे मार्गदर्शन सायबर क्राईमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर आणि समुपदेशक जान्हवी पाटील यांनी केले.
राजमाता जिजाउ संरक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालय आणि शाळांमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती आर.बी.काटकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी देखील मनाचे शस्त्र धारधार ठेवा असे मार्गदर्शन केले. यावेळी महिला बालविकास विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वप्नाली पवार दोन दिवस मुलींना स्वयंसिध्दाचे प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणाचा लाभ घेणार्या मुलींना सहभाग प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.