लोटे एमआयडीसीमध्ये मंदीचा सामना परप्रांतीय कामगार परतले गावाला

लोटे परशुराम वसाहतीतील कारखाने ठप्प

खेड | प्रतिनिधी : ज्या परप्रांतीयांबाबत कायम ओरड करणाऱ्या मराठी माणसाला आता परप्रांतीय गावाला गेल्याने भविष्याची चिंता भेडसावू लागली आहे. जणू काही त्याच्या खिशाला त्याची चणचण भासू लागल्याचे चित्र सध्या खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत आणि आजूबाजूच्या बाजारपेठांतून दिसत आहे.

लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखाने बंद पडल्याचे पडसाद आता दिसू लागले आहेत. अडीचशेहून अधिक कारखाने असणारी रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे- परशुराम औद्योगिक वसाहत मागील सहा महिन्यांपासून मंदीचा प्रचंड सामना करत आहे. नामांकित कारखानेही यातून सुटलेले नाहीत. परिणामी नोकर कपात सक्तीने केली जात आहे. त्यामुळे वसाहतीवर अवलंबून असणारे सर्वच व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.

वसाहतीत स्थानिक कामगार, अधिकारी यांच्यासोबत ठेकेदारी तत्त्वावर काम करणाऱ्या परप्रांतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचबरोबर जिल्ह्याबाहेरील कामगार, अधिकारीही मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक कारखाने बंद असल्याने कंपन्यांनी अनेकांना सक्तीची रजा दिली आहे. ठेकेदारांच्या कामगार संख्येत कपात केली आहे. साहजिकच यातील परजिल्ह्यातील व परप्रांतातील कामगार आपापल्या गावी गेले आहेत.

याचा मोठा फटका खेड, चिपळूण बाजारपेठेसह लोटे येथील मिनी बाजारपेठेला बसला आहे. परजिल्ह्यातील व परप्रांतीय यांनी निवाऱ्याची सोय करून देणाऱ्या अनेक चाळी ओस पडल्या आहेत. अजून किती दिवस या मंदीचा सामना कराव लागेल, याबाबत कारखानदारह अनभिज्ञ आहेत.

मंदीचा सामना किती दिवस करणार?

हॉटेल, कापड विक्रेते, भाजी, किराणा, जनरल स्टोअर्स, चहा वडापाव विक्रेते, रिक्षा, खासगी वाहतूक, मेडिकल, डॉक्टर्स अशा विविध प्रकारचे व्यावसायिक हतबल झाले आहेत. एवढेच नव्हे तर या परजिल्ह्यातील व परप्रांतीययांना निवाऱ्याची सोय करून देणाऱ्या अनेक चाळी ओस पडल्या आहेत. अजून किती दिवस या मंदीचा सामना करावा लागेल, याबाबत कारखानदारही अनभिज्ञ आहेत. कारखाने बंद पडले तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.