जे. के. फाईल्स येथे महामार्गावर पाणीच पाणी
रत्नागिरी : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर जे. के. फाईल्स येथे अनधिकृत विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे पाणी साचले होते. कालपासून वाहनचालक व पादचारी यांना त्रास सहन करावा लागत होता, याची दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वात तात्काळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क साधत गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला.
जे. के. फाईल्स नजीक रस्त्यावर अनधिकृत विक्रेत्यांनी मांडलेल्या स्टॉल्समुळे पाणी जाण्यास अटकाव होत होता. काल दुपारपासून पावसाचे प्रमाणही वाढले. त्यामुळे येथे पाणी साचू लागले. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग असल्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते. अशा वेळी वाहनचालकांना साचलेल्या पाण्याचा त्रास होऊ लागला. ही माहिती मिळताच भाजयुमो सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी याची दखल घेत आज सकाळी जेसीबीसह कामगार पाठवले. त्यावेळी प्रवीण देसाई यांनी स्वतः जातीनिशी लक्ष देत पाण्याचा निचरा होण्याकरिता प्रयत्न केले.