
देवगड तालुक्यातील वळीवंडे गावाच्या जांभ्या कातळसड्यावर लज्जागौरीचे कातळचित्र आढळले आहे. कोकण इतिहास परिषद आणि देवगड इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातून ही माहिती पुढे आली आहे.
यापूर्वी कोकणात लज्जागौरीसदृश्य कातळचित्रे सापडली होती, पण त्यांची शैली वेगळी असल्याने संशोधकांमध्ये संभ्रम होता. मात्र वळीवंडे येथील शिरविरहित, द्विभुज व उत्तानपाद स्थितीतील प्रतिमा लज्जागौरीची हुबेहुब आकृती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राच्यविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर यांनी सांगितले की, “या प्रतिमांमधून प्रागैतिहासिक काळात मानवनं स्त्रीच्या सृजनशक्तीला दिलेले महत्व दिसते. वदामी चालुक्यांच्या काळातील शिल्पांशी तुलना करता हे कातळचित्र वैशिष्ट्यपूर्ण आहे.”
वळीवंडे येथे एकूण चाळीसहून अधिक कातळचित्रे असून त्यात तीन लज्जागौरी प्रकारातील चित्रे आढळली आहेत. या नव्या शोधामुळे कोकणातील मातृशक्तीच्या उपासनेला अधोरेखित करणारी अनेक कातळचित्रे प्रत्यक्षात लज्जागौरीची असल्याचे पुष्टीस मिळत आहे.
या संशोधनात अजित टाककर, योगेश धुपकर, लक्ष्मण पाताडे, किरण पांचाळ, महेंद्र देवगडकर आदींचे सहकार्य लाभले आहे. देवगड तालुक्यातील हा शोध कातळचित्रांच्या नकाशावर देवगडला विशेष स्थान मिळवून देणार आहे












