पावसाचा जोर कमी होणार की वाढणार याकडे लक्ष
चिपळूण (वार्ताहर) : यावर्षी नवरात्र उत्सवामध्ये पावसाने रोजच हजेरी लावल्यामुळे नवरात्रीमध्ये देवदर्शन करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांचे आणि रात्री दांडिया नृत्य नप्रेमींच्या आनंदावर विरजण पडत आहे. गणेशोत्सवपेक्षा नवरात्र उत्सवात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अजून दसऱ्यापर्यंत पाऊस असाच पडणार की त्याचा जोर कमी होणार याकडे दांडिया प्रेमींचे लक्ष लागले आहे.
यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गणपतीचे आगमन झाले. त्यामुळे सप्टेंबरमध्ये नवरात्र उत्सव सुरू झाला. दि. २२ रोजी घटस्थापना झाल्याने तेव्हापासून नवरात्र उत्सव सुरू आहे. मात्र पहिले एक दोन दिवस पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. परंतु आता पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच दुपारनंतर पावसाचा जोर वाढत जातो. त्यामुळे नवरात्र उत्सवामध्ये भाविकांच्या आनंदावर वरुण राजाने पाणी फेरले आहे. प्रत्येक गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सव सुरू असतो. त्याशिवाय काही सार्वजनिक मंडळे देवीची स्थापना करून नवरात्र उत्सव साजरा करतात. अशा ठिकाणी सुद्धा भाविकांची गर्दी होत असते. याशिवाय काही ग्रामदेवतेच्या मंदिरातून भाविक दर्शनासाठी जात असतात. मात्र यावर्षी पाऊस असल्यामुळे थोडी भाविकांची वर्दळ सुद्धा कमी झाल्याचे बोलले जात आहे.
सार्वजनिक नवरात्र उत्सव ज्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी मोठी आकर्षक विद्युत रोषणाई आणि खास दांडिया प्रेमींसाठी संगीतमय वातावरण निर्माण केले जाते. रोज दांडिया प्रेमी या नृत्यासाठी जात असतात. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण असल्यामुळे त्यांची सुद्धा निराशा झाली आहे. दिनांक २७ सप्टेंबर पासून पावसाचे नक्षत्र बदलले आहे. बदलत्या नक्षत्राचे वाहन म्हैस असे असल्याने पुढे अजून दसऱ्यापर्यंत पाऊस असाच पडणार की त्याचा जोर कमी होणारी आकडे आता दांडिया नृत्य प्रेमी आणि भाविकांचे सुद्धा लक्ष लागलं आहे. या नवरात्र उत्सवामध्ये बऱ्याच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होत असतात. या कार्यक्रमावरती सुद्धा त्या पावसामुळे विरजण पडले आहे. मात्र, वरुण राजा कितीही बरसला तरी नवरात्रोत्सव आणि त्याचा भक्तिमय आनंद भाविक घेतात. यातूनच भक्ती आणि शक्ती दिसून येते.












