आपले आरक्षण टिकवण्यासाठी सज्ज व्हा; मुंबई आझाद मैदानावर कुणबी एल्गार करू

उद्योजक वसंत उदेग यांनी केले कुणबी समाजाला आवाहन

चिपळूण (वार्ताहर) : ओबीसी प्रवर्गात घुसखोरी करून कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी जो हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेतला जात आहे हे चुकीचे आहे. त्यानुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे हा कुणबी समाजावर अन्याय आहे. हे कुणबी समाज बांधव कधीच खपवून घेणार नाहीत. यासाठी आम्ही निश्चितच आमचा संघर्ष आमच्या हक्क अधिकारांसाठी तीव्र करू आणि ९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मुंबई येथील आझाद मैदानावर चिपळूण तालुक्यातून बहुसंख्येने उपस्थित राहून एल्गार करू, असा परखड इशारा उद्योजक आणि कुणबी समाजाचे मार्गदर्शक वसंत उदेग यांनी दिला आहे.

चिपळूण शहरातील खेंड कांगणेवाडी येथे झालेल्या कुणबी समाजाच्या बैठकीमध्ये ९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलन संदर्भात माहिती देण्यात आली. त्यावेळी उद्योजक वसंत उदेग बोलत होते. सुरुवातीला श्री. चांदिवडे गुरुजी यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सभेत पुढे बोलताना उद्योजक वसंत उदेग यांनी सांगितले की, आता गप्प न बसता आपल्या समाजाच्या भवितव्यासाठी आणि येणाऱ्या पिढीच्या उत्कर्षासाठी आपण लढले पाहिजे. आता नाही तर कधीच नाही. कुणबी जातीसाठी एकीचे बळ दाखवून देऊ. त्यामुळे ९ ऑक्टोबर रोजी सर्वांनी आपली कामे बाजूला ठेवून मुंबई येथे स्वखर्चाने भाकऱ्या बांधून प्रस्थान करण्याची गरज आहे. कारण आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आणि ओबीसीमध्ये मराठा बांधव यांना घेऊ नये यासाठी ही लढाई असून समाजाची एकीची ताकद दाखवून देऊ असे त्यांनी सांगितले.

मुंबई आझाद मैदानावरती कुणबी एल्गार करायचा आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, सरकारने काढलेला जीआर रद्द करावा आणि जातनिहाय जनगणना व्हावी अशा अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी मैदानावरती प्रचंड संख्येने उपस्थित राहू असे त्यांनी समाजाला आवाहन केले. या संदर्भातील समाज बांधवांना माहिती देण्यासाठी शहरतील कांगणेवाडी येथे बैठक झाली. यावेळी समाज बांधवांनी सुद्धा आम्ही येणार आमची ताकद दाखवणार असा एल्गार केला. वसंत उदेग यांनी याबाबतची नेमकी दिशा काय असेल याची माहिती दिली. त्यानंतर कुणबी समाजोन्नती संघ शाखा ग्रामीण चिपळूण अध्यक्ष संतोष कुळे यांनी सुद्धा ओबीसी म्हणजे काय आणि आरक्षणाची मांडणी व त्याचे फायदे समजावून सांगितले. कुणबी सेनेचे जिल्हा सचिव प्रदीप उदेग यांनी सुद्धा आपल्याला हा लढा का द्यायचा आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर पदाधिकारी संजय जाबरे यांनी मार्गदर्शन केले.

या कांगणेवाडी येथील जनजागृती सभेला जेष्ठ उद्योजक आणि कुणबी शिक्षण मंडळ चिपळूण अध्यक्ष वसंत उदेग, समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक विलास खेराडे, नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष रतन पवार, माजी नगरसेवक रमेश खळे, संघ शाखा चिपळूण ग्रामीणचे अध्यक्ष संतोष कुळे, सचिव हर्षल कुळे, कुणबी सेना जिल्हा सचिव प्रदीप उदेग, तालुका प्रमुख संजय जाबरे, कुणबी शिक्षण मंडळ चिपळूण संचालक सुहास चव्हाण, अमोल निर्मल, दीपक मोरे, श्री. चोपडे, श्री. साप्ते, संजय गोताड आदी मान्यवर उपस्थित होते. कांगणेवाडीतील सर्व पुरुष महिला युवक वर्ग या सभेला सुद्धा उपस्थित होते या सभेचे प्रस्ताविक आणि सूत्रसंचलन श्री. चांदिवडे गुरुजी यांनी तर आभार माजी नगरसेवक रमेश खळे यांनी मानले.