कुडाळमध्ये लाखो रुपयांचा अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठा जप्त

 

 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

कुडाळ बाजारपेठेतील राधाकृष्ण कोल्ड्रिंक्सच्या बाजूला असलेल्या एका पान टपरीमध्ये हा अवैध साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती.

या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹ २,८८,६६०/- (दोन लाख अठ्ठ्यांशी हजार सहाशे साठ रुपये) किमतीचा अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

या प्रकरणी चार संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, ३(५) आणि अन्न सुरक्षा मानके कायदा कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींमध्ये इमरान शमसुद्दीन करोल रा. करोलवाडी, कुडाळ, इम्तियाज शमसुद्दीन करोल रा. करोलवाडी, कुडाळ, आरिफ करोल रा. शिवाजीनगर, कुडाळ, समीर पठाण रा. हुबळी, कर्नाटक यांचा समावेश आहे.

यापैकी इमरान करोल व इम्तियाज करोल यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कुडाळ पोलीस ठाणे येथे हजर केले.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, तसेच पोलीस हवालदार विल्सन डिसोजा आणि आशिष जामदार यांचा समावेश होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास

सुरू आहे.