कुडाळ :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी आहे. हा अपघात केवळ एका व्यक्तीचा नसून, महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाला बसलेला हा एक मोठा धक्का आहे. एका कणखर आणि अनुभवी नेतृत्वाच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
अजितदादांच्या कार्यशैलीचा गौरव करताना आमदार निलेश राणे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र आज एका स्पष्टवक्त्या, अत्यंत निर्णयक्षम आणि सामान्य माणसाच्या दुःखाशी थेट नाळ जोडलेल्या दिलदार नेत्याला मुकला आहे. प्रशासनावर असलेली त्यांची विलक्षण पकड आणि कामाचा वेग यामुळे त्यांनी संपूर्ण राज्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या कर्तृत्वाने, खंबीर नेतृत्वाने आणि जनतेप्रती असलेल्या अफाट बांधिलकीने त्यांनी कायम जनमानसात अढळ स्थान मिळवले होते.
या दुःखद प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असून, परमेश्वर त्यांच्या परिवाराला हे असह्य दुःख पेलण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना आमदार निलेश राणे यांनी केली आहे. एका धडाडीच्या आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वाचा असा अकाली अंत होणे, हे राज्याच्या राजकारणातील एक मोठे नुकसान असल्याचे सांगत त्यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.












