सावंतवाडी । प्रतिनिधी : मुंबईतील आझाद मैदानावर शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्यावतीने होत असलेल्या दसरा मेळाव्याला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबतच ५ हजार कार्यकर्ते जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंबईतील आझाद मैदानावर हा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच मिनी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता हा मेळावा अधिकच भव्य दिव्य होणार आहे. त्यामुळे राज्यभरातून शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मुंबईकडे रवाना होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदार संघातूनदेखील किमान ५ हजार शिवसैनिक मुंबईत जाण्याचे उद्दिष्ट आहे. मतदारसंघातील १७ जिल्हा परिषद व तीन शहरांमधून प्रत्येकी २५० कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत. त्याच बरोबर इतर शिवसैनिकांना व ग्रामस्थ व नागरिकांनाही या मेळाव्याला उपस्थित राहायचे असल्यास त्यांनी संपर्क आवाहन संजू परब यांनी केले आहे.
दरम्यान, मतदारसंघात आमची तयारी पूर्वीपासून आहे. निवडणूक लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमचे नेते आम. दीपक केसरकर ठरवतील ते आम्हाला मान्य असणार आहे. त्यांच्या मनातील इच्छा आम्ही पूर्ण करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, महिला जिल्हा आघाडी प्रमुख ॲड. निता कविटकर, वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, अर्चित पोकळे, भारती मोरे, हर्षद डेरे, आबा केसरकर, सुजित कोरगावकर आदी उपस्थित होते.











