रत्नागिरीत समाजकंटकाचा खोडसाळपणा; काचा फोडून कार पेटवली

संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू

रत्नागिरी: शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या आठवडा बाजार परिसरात पहाटेच्या शांततेत एका उभ्या चारचाकी वाहनाला अज्ञाताने लक्ष्य केले. वाहनाच्या काचा फोडून त्याला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली असून, या आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. कृत्य केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला.
पहाटेच्या सुमारास एक संशयित इसम परिसरातील उभ्या असलेल्या कारजवळ आला. त्याने सर्वप्रथम गाडीच्या काचा फोडल्या आणि त्यानंतर वाहनाला आग लावून पळ काढला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. वाहनातून अचानक धूर आणि ज्वाळा निघताना पाहून स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली.
परिसरातील नागरिकांनी तात्काळ रत्नागिरी शहर पोलीस आणि नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेत वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली गाडी मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाली होती.
या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, रत्नागिरी शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. आग लावणाऱ्या इसमाचा माग काढण्यासाठी पोलीस आठवडा बाजार परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करत आहेत.