ओटवणे दसरोत्सव सोहळा भाविकांनी अनुभवला “याची देही याची डोळा”.उद्या होणार गावाकौलाने सांगता

ओटवणे( प्रतिनिधी)

ओटवणे गावच्या संस्थानकालीन दसरोत्सवाचा पहिला खंडे नवमी चा दिवस भाविक भक्तांच्या अलोट गर्दीत उत्साहात संपन्न झाला.काल खंडेनवमी दिवशी शिवलग्न सोहळा, इंगळे नहाणे याच बरोबर नवस फेडणे बोलणे आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. रिती रिवाजानुसार अनेक कार्यक्रम विधी परंपरा आज पार पडल्या.दसरोत्सवात महिला वर्गाची नवस फेडण्याची आगळी वेगळी आणि पर्वणी असणारी नवस फेडीची परंपरा ,‘इंगुळके नहाणे’म्हणजेच इंगळ्यांची आंगोळ हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. साडे चारशे वर्षाची परंपरा लाभलेल्या या सोहळ्यास दरवर्षी भाविकांची अलोट गर्दी असते. या वर्षीही हा अभूतपूर्व सोहळा उत्साहात पार पडला.विशेष म्हणजे सुवर्ण तरंगे पाहण्यासाठी सातेरी रवळनाथ चरणी लीन होण्यासाठी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता.पावसाची रिमझिम होती पण काही काळ पावसानेही उसंत घेतल्यामुळे भाविकानाही हा नेत्रदीपक सोहळा पावसाच्या अडथळ्या शिवाय याची देही याची डोळा पाहता आला. या सर्व क्षणाचे साक्षीदार होता आले व रवळनाथ सातेरी सह देव देवतांचे तेजस्वी रुप पाहता आले. हजारो भाविक रवळनाथचरणी नतमस्तक झाले.आपट्याची पाने ज्याला आजच्या दिनी खूप महत्व असत ती भाविक ग्रामस्थांनी एकमेकांना सोन म्हणून देत शुभेच्छा दिल्यात. वर्षातून एकदाच बघायला मिळणारी सुवर्ण तरंगे पाहण्याचा योग भाविकांनी अनुभवला आणि या सुवर्ण क्षणाचे साशीदार होण्याचे भाग्य मीळविले.

उद्या दसऱ्यादिवशी या उत्सवाची सांगता होत असून नवस बोलणे, नवस फेडणे, आदी धार्मिक कार्यक्रमासह तरंग काटिसह संचारपुरुष सह मानकरी ओटवणे नदी किनारी त्रिवेणी संगमावर असणाऱ्या खेमसावंत समाधीला भेट देवून पुन्हा मंदिराकडे येऊन त्यानंतर गाव कौलाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.