नाटळमध्ये स्त्री शक्तीचा सन्मान

नाटळमध्ये नारी शक्तीचा सन्मान

स्त्रि शक्तीचा सन्मान म्हणजे समाजात, कुटुंबात आणि तिच्या कार्यक्षेत्रातील योगदानाची योग्य दखल घेणे. तिच्या कर्तृत्वाला मान्यता देणे व तिच्या हक्कांचा आदर करणे.सरस्वती पूजनाचे औचित्य साधत दरवर्षी राजवाडी उत्कर्ष मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय नाटळ प्रशालेत विद्या समिती अध्यक्षा सौ. उमा भालचंद्र सावंत यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील स्त्रियांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत स्त्रीशक्ती – नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्याचे यंदाचे तिसरे वर्ष असून यावर्षीही वैद्यकीय, अभिनय, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रातील नवदुर्गांचा आकर्षक सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला

सौ. उमा भालचंद्र सावंत पुरस्कृत या नवदुर्गा सन्मानसाठी डॉ. नम्रता कुरतडकर, सौ.छाया गावकर, कु. नूतन ठाकूर, सौ. नीता सावंत,श्रीम. सत्यवती मुरकर, सौ.दिपाली नेवाळकर, सौ. तेजस्विनी सावंत, कु.योगिता सोहनी, कु.वेदिका सावंत यांना गौरविण्यात आले.

स्त्री फक्त घराची जबाबदारी पार पाडणारी नसून ती प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवते.विविध नाती सांभाळत जगाला प्रेम संस्कार व आधार देते.म्हणूनच तिच्या परिश्रमाचा, त्यागाचा, आणि कर्तृत्वाचा सन्मान ही आपली नैतिक जबाबदारी मानत माध्यमिक विद्यालय नाटळ प्रशालेमार्फत आगळावेगळा उपक्रम ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी आयोजित केला जातो.

यंदाच्या सन्मानाचे खास वेगळेपण म्हणजे समाजातील सुईणेचे स्थान. जे पूर्वीच्या काळी ज्यावेळी कोणत्याही वैद्यकीय सुविधा वा वाहतूकीची साधने उपलब्ध नसताना स्त्रियांचा व नवजात बालकांचा जीव वाचवण्यासाठी व बाळंतपण सुखरूप पार पाडण्यासाठी कोणत्याही क्षणी नेहमी आपले कार्य तत्परतेने करणाऱ्या तसेच कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता कालबाह्य झालेल्या सुईणीची महत्त्वपूर्ण भूमिका निस्वार्थीपणे बजावणाऱ्या नाटळ गावातील श्रीम.सत्यवती मुरकर या वयोवृद्ध नवदुर्गेचा चेअरमन श्री. नितीन सावंत यांच्या कल्पनेतून विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी सन्मानपात्र डॉ. नम्रता कुरतडकर यांनी आपल्या यशाची मुळे याचा शाळेत विस्तारल्याचे सांगत शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करून आपल्या मनोगतातून आभार व्यक्त केले.

स्त्रीशक्तीचा सन्मान म्हणजे मानवतेचा सन्मान या शब्दात कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. प्रणिता तेली – बांबुळकर यांनी सर्व नवदुर्गांचे अभिनंदन करत आपले विचार व्यक्त केले.या सर्व नवदुर्गांचा सन्मान प्रशालेच्या विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन सहा. शिक्षिका सौ.उज्वला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.संस्था अध्यक्ष श्री. भालचंद्र सावंत,शालेय समिती चेअरमन श्री.नितीन सावंत,सर्व संस्था पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर वृंद व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या..