याची देही, याचा डोळा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
राजेंद्र साटम (शिरगाव) देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानचा दसरोत्सव बुधवारी शाही थाटात व पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत व *‘हर हर महादेव’*च्या जयघोषात हा सोहळा दुमदुमून गेला. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व चौऱ्याऐंशी खेड्यांचा अधिपती मानल्या जाणाऱ्या या देवस्थानाच्या उत्सवाला याची देही, याचा डोळा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती.
दुपारी श्री पावणाई देवी देवालयात ढोल-ताशांच्या गजरात इशारत करण्यात आली. यावेळी बारा-पाच मानकरी, ग्रामस्थ, देवसेवक व असंख्य भक्तगण मंदिरात जमा झाले. वस्त्राभूषणांनी सजविण्यात आलेल्या देवतरंग (शिवकळा) काढून त्याच्याकडून सीमोल्लंघनाचा हुकूम घेण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत व *‘हर हर महादेव’*च्या जयघोषात देवतरंगाबरोबर निशाणदार, भालदार, चोपदार, मशालदार, चौरवीदार, अबदागीर, घडशी, गोंधळी, देवाचे सेवेकरी, लव्याजम्यासह भक्तगण सीमोल्लंघनासाठी निघाले.
या मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या आपट्याच्या झाडाजवळ पोहचल्यावर ब्राह्मणाकरवी त्या झाडाची पूजन करण्यात आले. व नंतर आपट्याची पाने ‘सोने’ मानून भक्तांनी ती लुटली. ‘सोने’ लुटण्यासाठी चांगलीच झुंबड उडाली. त्यानंतर देवता परत येताना चौऱ्याऐंशीच्या चाळ्याला तसेच श्री गांगेश्वर-विठ्ठलाई देवीला भेट देण्याचा रिवाज आहे. पुढे देवता श्री सिद्धेश्वर, श्री देवी पावणाई व श्री रवळनाथ देवालयाभोवती प्रदक्षिणा घालून भक्तांना दर्शन दिले.
त्यानंतर देवता पापडीवर पोहोचल्यावर भक्तगणांनी देवास ‘सोने’ अर्पण करून कृपाशिर्वाद घेतला. हा सोहळा याची देही, याचा डोळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी तसेच देवदर्शनासाठी भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती.
देवीची ओटी भरण्यासाठी माहेरवाशीणींची उपस्थिती लक्षणीय होती, तसेच चाकरमान्यांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली. शिरगाव दशक्रोशीतील भाविकांच्या सहभागामुळे मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता.












