साळशी–चाफेड मार्गावरील रस्ता वाहतुकीस धोकादायक

वटेश्वर महादेव मंदिराजवळील मोरीला वर्षभरातच पुन्हा भगदाड

शिरगाव (प्रतिनिधी)      देवगड तालुक्यातील साळशी–चाफेड–कणकवली मार्गावरील सरमळेवाडी येथील वटेश्वर महादेव मंदिराजवळील मोरी पुन्हा धोकादायक ठरू लागली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात याच मोरीला भगदाड पडल्याने तात्पुरती उपाययोजना करून वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, बांधकाम विभागाने केलेली तात्पुरती मलमपट्टी फेल ठरल्याने केवळ एका वर्षातच पुन्हा त्याच ठिकाणी भगदाड पडल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे.

सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली ही मोरी जीर्ण झाली असून ती धोकादायक अवस्थेत आहे. देवगड–कणकवली हे दोन तालुके जोडणारा जिल्हा मार्ग क्रमांक १५ अत्यंत जवळचा व महत्त्वाचा आहे. या मार्गावर एसटी बससह खाजगी वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. साळशी–पिंपळपार ते चाफेड गावठाण फाटा या साधारण तीन किलोमीटरच्या पट्ट्यात डांबरीकरण झालेले नसल्याने प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही.

वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या या मार्गावरील देखभाल-दुरुस्तीची कामे कासवाच्या गतीने सुरू आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ ठोस उपाययोजना करून हा मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. अन्यथा या मार्गावरील वाहतूक कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.