दाभोली हायस्कूलचा अनोखा उपक्रम ‘भव्य चटणी भाकरी महोत्सव’…

विद्यार्थ्यांसह पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले l दाजी नाईक :दाभोली हायस्कूल चे मुख्यद्यापक श्री. किशोर शांताराम सोनसुरकर सर यांच्या संकल्पनेतून दाभोली इंग्लिश स्कुल व कॉज टू कनेक्ट फाउंडेशनच्या सहकार्याने बहुविध कौशल्य अभ्यासक्रमातील अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभागातर्फे “चटणी भाकरी महोत्सव (माझी भाकरी मी बनवणार)” हा उपक्रम विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

सिंधुदुर्ग मधील विविध शालेय व

सहशालेय उपक्रम राबवून उपक्रशील शाळा म्हणून कौतुकास्पद कामगिरी करणारी

वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटी चे दाभोली इंग्लिश स्कूल, दाभोली येथे सरस्वती पूजनाचे औचित्य साधून हा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांमधील आरोग्य व आहार या बाबत आढळून येणारी उदासीनता आणि आधुनिकतेच्या नावाखाली घेतला जाणारा चुकीचा आहार याची माहिती देणे. आणि पारंपरिक पौस्टिक आहार कडे होणारे दुर्लक्ष त्याच बरोबर आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनातं घरी आई वडील नसताना भूक लागल्यावर स्वतः चा आहार स्वतः बनविणे बाबत ची गोडी निर्माण व्हावी म्हणून हायस्कूलमध्ये हा महोत्सव घेण्यात आला.

एकुण विद्यार्थी एकत्र बोलाऊन त्यांचे पाच समान गट करून त्यांना स्वतंत्र्य चूल तसेच गॅस शेगडी देण्यात आली. त्यांना मार्गदर्शक देऊन सर्व मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन चटणी भाकरी स्वतः बनवून हा महोत्सव यशस्वी केला. मुलांनी व मुलींनी मिळून पिठ मळणे, भाकरी थापणे, तव्यावर भाजणे, लसूण-खोबर्‍याची चटणी तयार करणे अशी सर्व प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे तब्बल ११० भाकऱ्या भाजून या उपक्रमाची शोभा वाढवली.

या अनोख्या उपक्रमात केवळ स्वयंपाकच नाही, तर भाकरीचा इतिहास, भाकरीसाठी लागणाऱ्या धान्यांची माहिती, कृतीचे वैज्ञानिक विश्लेषण आणि अनुभव विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक लेखी नोंद स्वरूपात सादर केले. या सगळ्याचे दस्तावेजीकरण करून एक विशेष फाईल तयार करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या मधुर भजनांनी वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर छोटया छोटया हातानी बनविलेल्या चटणी-भाकरीचा नैवेद्य सरस्वती देवीला अर्पण करून विशेष व वेगळ्या पद्धतीने कृतियुक्त शिक्षण सेवा अर्पण करण्यात आली व प्रसाद स्वरूपात सर्वांना अल्पोपहार म्हणून विद्यार्थी नी बनविलेल्या चटणी भाकरी चे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेली चटणी भाकरी पारंपरिक पद्धतीने केळीच्या पानावर घेऊन केळीच्या पानावर जेवण करून प्लास्टिक डिश वापर टाळण्याचा संदेश या वेळी दिला. अतिशय नियोजन बद्ध पद्धतीने हा उपक्रम संपन्न झाला.

दाभोली येथील या उपक्रमादरम्यान वेंगुर्ला तहसीलदार श्री. ओंकार ओतारी यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चटणी भाकरीचे कौतुक करून घरी आपल्या आई, पालक यांना सहकार्य करावे तसेच पोषक आहार घेणे किती महत्वाचे आहे हे सांगितले. विशेष म्हणजे तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांसमवेत एकत्र पंगतीत सहभाग घेत चटणी भाकरी चा आस्वाद घेतला. सोबतच मातृसेवा फाउंडेशन चे ट्रस्टी/सचिव श्री. सुहास सामंत सर, ट्रस्टी श्री.मिलिंद नाईक, सभासद श्री. श्याम परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संजय आरोलकर, पालक-शिक्षक संघ चे उपाध्यक्ष श्री. आत्माराम प्रभू खानोलकर व श्री सुधीर गोलतकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. किशोर सोन्सुरकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. रेश्मा चोडणकर, सिंधुदुर्ग प्रकल्प समन्वयक श्री.भोगले सर, विज्ञान विभाग प्रमुख श्री वसंत पवार, पालक, ग्रामस्थ, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच माजी विद्यार्थी, स्थानिक मंडळींनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या या महोत्सवाचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. यावेळी मार्गदर्शक निदेशक कार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञान विभाग चे निदेशक दत्तप्रसाद सांगेलकर सर, ऊर्जा आणि पर्यावरण विभाग चे निदेशक – राजेश कांबळी सर, बागकाम आणि शेती तंत्रज्ञान विभाग च्या निदेशिका – प्रतिक्षा पोईपकर मॅडम, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग च्या निदेशिका – संस्कृती अणावकर मॅडम, श्री नितीन घोगळे, सौ पेडणेकर मॅडम, सौ स्मिता दाभोलकर आदि पालक उपस्थित होते.