म्युनिक : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध आता केवळ दोन देशांपर्यंत मर्यादित राहिलं नसून, त्यात जगातील अनेक देशांनी उडी घेतल्यामुळे हा संघर्ष अधिकच पेटला आहे. जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतेच एक अत्यंत गंभीर विधान केले आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “आम्ही केवळ युक्रेनसोबत नव्हे, तर पूर्ण नाटोसोबत (NATO) लढत आहोत.” नाटो देश या युद्धात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उतरले असल्याचा दावा पुतिन यांनी केला आहे. यावेळी त्यांनी नाटोला इशारा देत म्हटले की, “आम्हाला नाटो देशांसोबत लढण्याची इच्छा नाही, पण जर ते रशियाला बदनाम करून युद्ध पुकारत असतील, तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.” या तणावाच्या वातावरणात, युक्रेनने थेट अमेरिकेकडे घातक मिसाईलची मागणी केल्यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. युक्रेनला ही मिसाईल देण्याच्या कोणत्याही निर्णयापूर्वीच रशियाने अमेरिकेला मोठा आणि स्पष्ट इशारा दिला आहे. रशियाने म्हटले की, युक्रेनला ही मिसाईल पुरवल्यास युद्धाचे वातावरण अधिकच चिघळेल आणि याचा थेट परिणाम अमेरिका-रशिया संबंधांवर होऊन ते खराब होतील. एकूणच, या घडामोडींमुळे युक्रेन-रशिया संघर्ष आता एका गंभीर टप्प्यावर पोहोचला असून, तो नाटो आणि अमेरिकेला थेट आव्हान देत असल्याचे दिसत आहे.
जर्मनीच्या म्युनिक विमानतळावर ‘ड्रोन हल्ला’;
युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता जर्मनी देखील रशियावर थेट आरोप करताना दिसत आहे. या तणावामध्येच एक मोठी घटना घडली आहे, ज्यामुळे युरोपातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जर्मनीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे असलेले म्युनिक आंतरराष्ट्रीय विमानतळ शुक्रवारी अचानक बंद करण्यात आले. विमानतळ परिसरात १७ ड्रोन आढळून येणे. विमानतळ प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत १७ विमानांची उड्डाणे रद्द केली. तसेच, म्युनिक विमानतळावर उतरण्यासाठी आलेली अनेक विमाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून दुसऱ्या विमानतळावर उतरवण्यात आली. विमानतळावर दिसलेले हे १७ ड्रोन रशियाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. जर्मनीने थेट रशियावर अशा प्रकारे देशाच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर घुसखोरी करण्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे, युक्रेनमधील युद्ध आता केवळ लष्करी संघर्ष न राहता, युरोपमधील इतर देशांच्या सुरक्षिततेला थेट आव्हान देत असल्याचे स्पष्ट होते. नाटो आणि रशिया यांच्यातील तणाव केवळ राजकीय स्तरावरच नाही, तर जमिनीवर देखील कसा वाढत आहे, हे या घटनेतून सिद्ध होते.












