दोडामार्ग:सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यात काल भक्तिमय वातावरणात आणि वाजत-गाजत विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला आज दीड दिवसानंतर भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. तालुकयातील विविध गावांमधील घरगुती गणपतींचे आज संध्याकाळी स्थानिक नद्या, तलाव आणि विसर्जन घाटांवर विसर्जन करण्यात आले.
काल गणेश चतुर्थीच्या दिवशी तालुक्यातील घराघरांत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात श्रींची स्थापना करण्यात आली होती. दीड दिवसांच्या पाहुणचारानंतर आज आरती, मंत्रपुष्पांजली आणि उत्तरपूजा करून लाडक्या बाप्पाला विसर्जनासाठी नेण्यात आले.
नद्या आणि विसर्जन घाटांवर गर्दी
तालुक्यातील तिलारी नदी, विविध गावांमधील स्थानिक नद्या, बंधारे आणि शेततळ्यांवर विसर्जनासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती.झरेबांबर साईनगर बहू उद्धेशीय मंडळ यांचे वतीने उसप रोड येथील भंडारा पुलावर गणपती विसर्जन करण्यात आले “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”, “एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार” अशा जयघोषांनी आणि पारंपरिक ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.
शिस्तबद्ध वातावरण आणि पोलीस बंदोबस्त
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोडामार्ग पोलिसांच्या वतीने मुख्य विसर्जन स्थळांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक प्रशासनाने आणि ग्रामपंचायतींनी विसर्जन घाटांवर दिवे तसेच सुरक्षिततेची योग्य व्यवस्था केली होती. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच अत्यंत जड अंतःकरणाने आणि भक्तिभावाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.












