update | शिरोडा समुद्रात ९ पर्यटक बुडाले

पाण्याबाहेर काढलेल्या ५ पर्यटकांपैकी ३ मयत तर सुदैवाने २ बचावले

४ जणांचा शोध सुरू : रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविली

बेळगाव येथील कित्तूर व कुडाळ येथील मणियार कुटुंबावर शोककळा

वेंगुर्ले : प्रतिनिधी
शिरोडा – वेळागर येथील समुद्रकिनारी आज शुक्रवारी दुपारी ४:४५ दरम्यान बेळगाव व कुडाळ येथील दोन कुटुंबातील ९ जण फिरण्यासाठी आले होते. निळ्याशार समुद्राच्या लाटावर पाण्यात खेळण्याची त्यांना इच्छा झाली. त्यामुळे सगळेजण समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र समुद्राला तुफान असल्याने एका मोठ्या लाटेबरोबर हे सर्वजण पाण्यात खेचले जाऊन बुडाल्याची घटना घडली. स्थानिकांमुळे सदर पर्यटकातील ५ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र यातील ३ पर्यटक मयत असून एक पुरुष आणि एक महिला बचावली आहे. अत्यवस्थ महिलेवर शिरोडा उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहे.
तर उर्वरित ४ पर्यटक समुद्राच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. मात्र ते सापडू शकले नाहीत. रात्र झाल्याने आणि समुद्र खवळलेला असल्याने पोलिसांनी बचाव कार्य थांबवले आहे. उद्या सकाळी पुन्हा बचाव कार्य सुरू करून त्या चौघांचा शोध घेतला जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.

बेळगाव येथील कित्तूर कुटुंब काल बेळगाव येथून कुडाळ गुडीपूर येथील आपले नातेवाईक मणियार कुटुंबीयांकडे आले होते. आज त्यांनी फिरत फिरत शिरोडा समुद्रकिनारी दुपारी भेट दिली. मौज मजा करण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरलेल्या या दोन्ही कुटुंबावर काळाने घाला घातला. बघता बघता होत्याचे नव्हते झाले. आणि पाण्यात उतरलेले ९ जण समुद्राच्या पाण्यात बुडाले. किनाऱ्यावर असलेल्या स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले
आजू अमरे, सूरज अमरे, समीर भगत तसेच राज स्पोर्ट्सचे राजेश नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुडत असलेल्या या पर्यटकांना पाण्याबाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करून ९ जणांपैकी ५ जणांना बाहेर काढण्यात त्यांना यश आले. उर्वरित चार जणांना पाण्यात शोधण्यासाठी बोटी द्वारे रात्रीपर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र ते चारही जण सापडू शकले नाही.
समुद्रातून बाहेर काढलेल्या पर्यटकांमध्ये दोघे बचावले
समुद्रातून बाहेर काढलेल्या पाच पर्यटकांमध्ये दोघे बचावले आहेत. यामध्ये इसरा इम्रान कित्तूर, वय वर्ष १७ रा. लोंढा, बेळगाव आणि इमरान अहमद मोहम्मद इसाक कित्तूर रा. लोंढा, बेळगाव अशी त्यांची नावे आहेत.
मात्र तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये श्रीमती फरहान इरफान कित्तूर, वय ३४, रा. लोंढा, बेळगाव, श्री इबाद इरफान कित्तूर , वय १३ रा. लोंढा, बेळगाव आणि श्रीमती नमीरा आफताब अख्तर वय १६, रा अल्लावर, बेळगाव यांचा समावेश आहे.
मात्र समुद्रात बुडालेल्या इरफान मोहम्मद इसाक कित्तूर, वय ३६ रा. लोंढा, बेळगाव, इक्वान इमरान कित्तूर, वय १५ रा. लोंढा, बेळगाव, फरहान मोहम्मद मणियार, वय २०, रा. कुडाळ गुडीपूर जिल्हा सिंधुदुर्ग, जाकीर निसार मणियार वय १३, रा. कुडाळ गुडीपूर जिल्हा सिंधुदुर्ग हे चौघे बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे.