स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण : बघ्यांची तोबा गर्दी
बांदा : प्रतिनिधी
ओंकार हत्तीचा सध्या कास गावात अक्षरशः धुडगूस सुरू आहे. भर वस्तीत हत्ती येत असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाय हत्तीला पाहण्यासाठी लहान मुले, वृद्ध व महिला गर्दी करत असल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे. अखेर स्थानिकांना आवरण्यासाठी बांदा पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर हत्तीला भात शेती परिसरात हुसवण्यात आले.
ओंकार हत्ती सध्या कास गावात स्थिरावला आहे. त्याच्याकडून भात शेती, केळी बागायतीचे अतोनात नुकसान सुरू आहे. वनविभागाचे कर्मचारी केवळ फटाके फोडण्याचेच काम करत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. रविवारी सकाळी ओंकार हत्ती कास – पंडितवाडी येथे भर वस्तीत येऊन गेला. त्यानंतर सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा पंडित वाडी परिसरात आला. यावेळी त्याने रस्त्यावरच ठाण मांडले होते. त्याला जंगलात पाठवण्याचे वनविभागाचे प्रयत्न निष्फळ ठरत होते.
हत्ती पंडीतवाडी परिसरात आल्याची माहिती मिळताच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने हत्ती पाहण्यासाठी दाखल झाले. वनविभाग कर्मचारी लहान मुले, वृद्ध महिला यांना दूर राहण्याचे आवाहन करीत होते. मात्र स्थानिक ग्रामस्थांकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. हत्ती आक्रमक झाल्यास कोणतीही दुर्घटना होऊ शकते याबाबत ते ग्रामस्थांना समजावत होते. मात्र स्थानिक त्यांना दात देत नव्हते.
ओंकार हत्ती सुमारे तासभर रस्त्यावर असल्याने दोन्ही बाजूची वाहने रोखण्यात आली होती. हत्तीच्या चारही बाजूने बघ्यांची गर्दी झाल्याने हत्ती रस्त्यावरच ठाण मांडून होता. अखेर घटनास्थळी बांदा पोलिस आल्यानंतर ग्रामस्थांना पांगविण्यात आले. त्यानंतर हत्तीला शेती परिसरात सोडण्यात आले. कोणतीही दुर्घटना होण्याच्या आधी वनविभागाने तत्काळ हत्ती पकड मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी सरपंच प्रवीण पंडित यांनी वनविभागाकडे केली आहे.












