अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

कणकवली : कणकवली येथे दुचाकी वरून पडून जखमी झालेल्या रोहन रोहिदास महाडेश्वर ( वय ४५ रा. जाणवली सापळेबाग ) यांचे उपचारादरम्यान शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी पहाटे निधन झाले. रोहन म्हाडेश्वर यांचे बेळणे येथे बेल हॉटेल आहे. रोहन महाडेश्वर यांच्या पश्चात त्यांचे वडील मुलगा आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.

रोहन महाडेश्वर हे २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६:४५ वा. च्या सुमारास दुचाकीने शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकातून गांगोमंदिर कडे जाणाऱ्या सर्व्हीस रस्त्यावरून जात होते. अभ्युदय बँकेसमोर त्यांचा गाडीवरून स्वतः हून तोल गेला आणि ते खाली पडले. अपघात स्थळी पोहोचलेल्या मिथुन ठाणेकर यांनी रोहन महाडेश्वर यांना अपघाताबाबत विचारले असता त्यांनी मी गाडीवरून तोल गेल्याने पडलो आहे, असे सांगितले. अपघातात जखमी झालेल्या रोहन यांना उपचारासाठी जाण्यास सांगितले असते त्याने घरी सोडण्यास सांगितले. त्यामुळे ठाणेकर यांनी त्यांना घरी नेऊन सोडले. अपघातानंतर रोहन महाडेश्वर कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र शुक्रवारी पहाटे ३ वा. च्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.