सांगवे – तेलंगवाडी येथे विनापरवाना जनावर वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

कणकवली : तालुक्यातील कनेडी सांगवे तेलंगवाडी परिसरात विनापरवाना जनावर वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध कणकवली पोलिसांनी कारवाई केली आहे. ही घटना ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३० वा. च्या सुमारास घडली.

राजेंद्र विष्णु गांवकर (वय ४८, रा. सांगवे, ता. कणकवली) हे आपल्या काही साथीदारांसह दसरा उत्सवाचा कार्यक्रम संपवून घरी परतत असताना सांगावे कनेडी तेलंगवाडी परिसरात बोलेरो पिकअप (क्र. एमएच ०९ ईएम ८०७५) या वाहनातून जनावराचा आवाज आल्याचे त्यांनी ऐकले. त्यांनी वाहन थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे गुरे वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती गांवकर यांनी तात्काळ कणकवली पोलिसांना दिली.

पोलिस उपनिरीक्षक महेश शेडगे व हवालदार सुनील वेंगुर्लेकर यांनी सहकारी अन्य पथकासह घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता, सदर बोलेरो वाहनाच्या हौद्यात काळ्या रंगाचा मुरा जातीचा रेडा आढळला. वाहन चालक महेंद्र शिवाजी डाफळे (वय २६) व त्याचा चुलत भाऊ सर्वजीत युवराज डाफळे (वय १९, दोघे रा. सावर्डे खुर्द, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे या वाहनातील दोघांची ओळख पटली. दोन्ही इसमांनी जनावराची विनापरवाना, चारा-पाण्याची सोय न करता आणि निर्दयीपणे दाटीवाटीने कोंबून वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून बोलेरो वाहन व जनावर ताब्यात घेतले असून, संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुनील वेंगुर्लेकर करत आहेत.