हेत येथील सकल फोंडके – पाटील मराठा समाजाचे दसरा संमेलन उत्सहात संपन्न

गावच्या प्रगतीसाठी एकजुट कायम ठेवुया : समाज बांधवांनी केला निश्चय

वैभववाडी प्रतिनिधी
हेत गावातील सकल फोंडके- पाटील मराठा समाजाचे दसरा संमेलन मुंबई येथे उत्साहात पार पडले. परेल येथील आयोजित संमेलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. गावच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करुया, असा निश्चय समाज बांधवांनी केला.

हेत गावातील फोंडके- पाटील समाजाची स्थापना सन १९७० साली झाली आहे. जवळ जवळ ९० टक्के तरुण मंडळी मुबई येथे कामानिमित्त वास्तव्यात आहेत. सोशल मीडिया व विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येत असतात. गावातील फोंडके पाटील मराठा समाजाचे एकत्रीकरण, समाजातील व गावातील सर्वांचा सर्वांगीण विकास या धोरणातून दरवर्षीप्रमाणे दसरा संमेलन पार पडले. दसरा संमेलनासाठी फोंडके मंडळी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मौजे हेत गावचे ग्रामदैवत श्री देव केदारलिंग देवाचे नामस्मरण व आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात कार्यक्रमाला सुरुवात झाली. तरुण सदस्यांनी समाजाच्या विकासासाठी व हेत गावच्या उन्नतीसाठीचे आपआपले विचार मांडले.

मुंबई व गावात कार्यरत राहण्यासाठी नवीन कार्यकारणीची स्थापना करण्यात आली. कार्यकारणीतील नवीन सदस्य यांना त्यांच्या यशस्वी वाटचालीस सर्वांच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन शुभेच्या देण्यात आल्या. गावातील सर्वच समाजाला एकत्र घेऊन सकल समाजाची व गावाची उन्नती करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला. सर्व फोंडके मंडळीने एकमेकांची गळाभेट घेत दसऱ्याचे सोने लुटले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले