राजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित

पुरूष उमेदवारांतील लढाई संपुष्टात
आता लढाई राजकिय पक्षांमध्ये
राजापूर प्रतिनिधी सोमवारी मुंबईत मंत्रालयात झालेल्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत राजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला राखीव झाले आहे. त्यामुळे या पदासाठी बाशिंग बांधून इच्छुक असलेल्या पुरूष उमेदवारांतील लढाई संपुष्टात आली असून आता खऱ्या अर्थाने राजकिय पक्षांमध्ये लढाई होणार आहे. नगराध्यक्षदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने आता कोण होणार राजापूरची प्रथम नागरिक याबाबत उत्सुकता लागून रहाणार आहे.
राजापूर नगर परिषदेच्या निवडणूकीची तयारी सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. लोकनियुक्त पध्दतीने नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. तर दहा प्रभागांतुन वीस नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत.
अंतिम प्रभाग रचना जाहिर झाल्यानंतर आता सोमवारी मुंबईत राज्यातील सर्व नगर पालिका, नगर परिषदा व नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली. यात राजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला राखीव झाले आहे.
नगराध्यक्षपदाचे आरक्षण काय पडते याकडे डोळे लावून बसलेल्या व या पदासाठी इच्छुक असलेल्या अनेक पुरूष उमेदवारांचा या आरक्षणामुळे चांगलाच हिरमोड झाला आहे. आरक्षण सोडतीपुर्वीच अनेक इच्छुकांनी या पदासाठी मोर्चेबांधणी करत तयारी केली होती. मात्र महिला राखीव आरक्षणामुळे आता पुरूषांमधील लढाई संपुष्टात आली असून आता राजकिय पक्षांमध्ये खऱ्या अर्थाने लढाई होणार आहे. सर्वज राजकिय पक्षांकडे महिला उमेदवारांची चांगलीच गर्दी असल्याने कोण बाजी मारणार याबाबतही उत्सुकता लागून रहाणार आहे.
महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून इच्छुक महिला उमेदवारांना यामुळे दिलासा मिळाला आहे. आता अनेक इच्छुक उमेदवारांचे लक्ष हे बुधवारी होणाऱ्या प्रभाग आरक्षणाकडे लागले असून त्यानंतर मात्र शहरात निवडणूकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.