विभागीय वन अधिकारी सौ. गिरीजा देसाई
चिपळूण (प्रतिनिधी) : जैवविवधतेसहीत निसर्गसंपन्न असलेल्या चिपळूण शहराची जी ओळख कोकणातील हार्ट ऑफ सिटी म्हणून केली जाते. भावी पिढीला जैवविविधता व वन्यप्राण्यांची ओळख व्हावी, निसर्ग, पर्यावरण रक्षणासाठी या पिढीचा सहभाग निर्माण व्हावा याकरिता निसर्ग, पर्यावरण व वन्यजीवप्रेमी तसेच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन विविध अभियान राबवावेत. प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी सौ. गिरीजा देसाई यांनी केले. आर्ट गॅलरीतील वन्यजीव प्रदर्शन शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.
रत्नागिरी वन विभागातर्फे दि. २ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार रविवारी वन विभाग परिसरात उभारण्यात आलेल्या आर्ट गॅलरी सभागृहात पशु-पक्षी, वनस्पती, वन्यजीव विषयक छायाचित्रांचे प्रदर्शन नागरिकांसाठी तीन दिवसांकरिता खुले करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ रविवारी सकाळी झाला. यावेळी विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी सांगितले की, कोकणात जैवविविधतेसह निसर्ग साधनसंपत्ती मुबलक आहे. त्याची जपणूक आणि सुरक्षा ही काळाची गरज आहे. वन विभाग व वन अधिकारी, कर्मचारी आपापल्यापरीने काम करीत आहेत; मात्र लोकसहभाग महत्त्वाचा आहे. तसेच भविष्यात पर्यावरण, निसर्गाचे रक्षण होण्यासाठी भावी पिढीलाही यात सहभागी करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी चळवळ उभी करावी लागेल. याकरिता पर्यावरण, निसर्ग व वन्यजीवप्रेमी, सामाजिक संस्थांनी सहभाग घेणे अपेक्षित आहे. भावी पिढीला या सर्वाची ओळख व्हावी या करिता संस्थांच्या माध्यमातून व वन विभागाच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांपासून या चळवळीला सुरुवात व्हावी. शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रमांतर्गत शारीरिक शिक्षण व अन्य काही उपक्रम राबविले जातात. तसेच वन्यजीवविषयक उपक्रम राबविणारा आठवड्यातून किमान एक तास तरी संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी त्या-त्या शैक्षणिक संस्थांकडून राखीव ठेवला जावा. जेणेकरून या तासामध्ये पशू-पक्षी, वनस्पती, पर्यावरण याची जवळून ओळख होऊन भावी पिढीला भविष्यातील निसर्ग व पर्यावरणाविषयी आत्मियता तसेच वन्यजिवांविषयी आत्मियता निर्माण होईल. यासाठी निसर्गविषयक काम करणार्यांनी एकत्र येऊन विविध समितींच्या माध्यमातून ही चळवळ उभी करावी, असे आवाहन केले.
यावेळी देसाई यांनी या चळवळीचा शुभारंभ विविध सात समिती स्थापन करून आवश्यक त्या नियोजनानुसार काम करण्याचे सूचीत केले. त्या अंतर्गत पक्षी, प्राणी, देवराया, वनस्पती, पर्यावरण रक्षण, पाणवठे आदींच्या विविध सात समिती स्थापन करून त्या-त्या विषयातील अभ्यासक, संशोधक व सामाजिक कार्यकर्ते यांना सहभागी करून घेऊन या समितींमार्फत आपण आता भविष्यातील पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहनही सौ. देसाई यांनी केले.
चौकट-
वन्यजिवांच्या संरक्षण व सुरक्षेसाठी वन विभागाच्या माध्यमातून रेस्क्यू व ट्रान्झिस्ट सेंटर सुरू करण्याबाबत शासन दरबारी प्रस्ताव आहे. यामध्ये जखमी प्राणी किंवा विविध ठिकाणी नागरी वस्तीत येणाऱ्या प्राण्यांना रेस्क्यू करणे, तसेच त्यांच्यावर उपचार करणे असे नियोजन असून प्राण्यांसोबत विविध प्रकारचे स्थलांतरित, दुर्मीळ व जखमी पक्षी यांच्या सुरक्षेसाठी एव्हीआरई सेंटरचा देखील प्रस्ताव असल्याची माहिती यावेळी विभागीय वन अधिकारी सौ. गिरीजा देसाई यांनी दिली.
फोटो फाईल- सीपीएन६-४













