लांजा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद खुल्या महिला प्रवर्गासाठी 

इच्छुकांची होणार भाऊगर्दी, कोणाला मिळणार उमेदवारी? कोण होणार नगराध्यक्ष याकडे लक्ष 

संतोष कोत्रे  : लांजा-: आज जाहीर झालेल्या राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीनंतर लांजा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे . त्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेल्या पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाला असला तरीही अनेक जण आपल्या पत्नीला नगराध्यक्ष बनवण्याच्या तयारीत असल्याने राजकीय भाऊगर्दी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसमोरील डोकेदुखी ही वाढणार आहे.

सोमवारी मंत्रालयात झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या सोडतीनंतर लांजा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला राखीव झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदावर डोळा ठेवून असलेल्या अनेक मातब्बर पुरुष उमेदवारांचा पुरता हिरमोड झाला आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने आता कोण होणार लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून नगरपंचायतीच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे लोकनियुक्त पद्धतीने नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. तर एकूण १७ प्रभागातून नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत.

लांजा नगरपंचायतीचा कार्यकाळ संपून जवळपास सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे सध्या नगरपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे .त्यामुळे लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे आणि विशेषता नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नेमके काय पडणार याकडे केवळ लांजावासीयांचेच नव्हे तर संपूर्ण लांजा तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. नगराध्यक्ष पदासाठी अनेक मातब्बर उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. तर काहींनी आपल्याला मिळाले नाही तर किमान आपल्या पत्नीसाठी तरी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळेल या दृष्टीने अगदी सुरुवातीपासूनच जोरदार बिल्डिंग लावली होती.

आज मंत्रालयातून लांजा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याचे जाहीर झाल्यानंतर आपल्या पत्नीसाठी इच्छुक असणाऱ्या पुरुष उमेदवारांमध्ये समाधान पसरले आहे. आगामी काळात आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी ते पक्ष नेतृत्वाकडे आग्रही भूमिका मांडतील. पण सर्वच पक्षांकडे या पदासाठी महिला उमेदवारांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये कोणाच्या वाटेला हे पद येणार आणि कोणाचा पत्ता कट होणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. तुर्तास सध्या तरी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्येकजण तयारीला लागला आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता पुढील काही दिवसातच शहरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे