९३ लाख ६० हजार रुपयांची दारू जप्त
कंटेनर चालक व क्लिनर ताब्यात
बांदा l प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाला बेकायदा दारूचे मोठे घबाड पकडण्यात यश आले आहे. गोव्याहून महाराष्ट्रात अवैध मार्गाने आणला जात असलेला ९३ लाख ६० हजार रुपयांच्या दारूसह १ कोटी ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेकायदा वाहतूक प्रकरणी कंटेनर चालक व क्लीनर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई सोमवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास इन्सुली तपासणी नाक्यावर करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास गोवा राज्यातून मुंबईकडे निघालेल्या कंटेनरची (जीजे १० झेड ९९८४) तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान वाहनाच्या केबिनच्या वरील भागात बनवलेल्या गुप्त कप्प्यात गोवा बनावटीचा रॉयल ब्लू व्हिस्की बाटल्यांचे ४४ बॉक्स आणि ४८ ब्लेंडेड प्लास्टिकच्या बाटल्यांचे बॉक्स, तसेच कागदी बॉक्समध्ये भरलेले एकूण ३७५ बॉक्स आढळले.
जप्त केलेल्या दारूची किंमत ९३ लाख ६० हजार रुपये आहे. वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे १५ लाख रुपये किमतीचा कंटेनर आणि २० हजार रुपये किमतीचे दोन अँड्रॉइड मोबाईल फोनसह एकूण १ कोटी ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी वाहनचालक रामनिवास (वय २५, रा. बाडमेर, राजस्थान) व नूर आलम (२६, रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक विवेक कदम, जवान रणजीत शिंदे, दिपक वायदंडे, सतीश चौगुले, अभिषेक खत्री, सागर सुर्यवंशी यांनी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत.
———-












