लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील देवधे शाळा नं.१ चे शिक्षक मंगेश कदम यांच्या विरोधात पालक आणि ग्रामस्थ यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांची शाळेतून तात्काळ बदली न झाल्यास उद्या बुधवारी ८ ऑक्टोबर पासून शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
देवधे शाळा नंबर १ चे शिक्षक मंगेश कदम यांच्या विरोधात देवधे पालक व ग्रामस्थ यांनी यापूर्वीच गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी लांजा यांना निवेदन दिले होते. त्यानुसार तालुक्यावरून चौकशी करता एक समिती देवधे नंबर एक शाळेमध्ये आली असता चौकशी दरम्यान शिक्षक श्री कदम यांनी समिती समोर उडवाउडवीची उत्तरे दिली. कागदपत्रे तपासणी करता मागितले असतात त्यांनी ती दिली नाहीत .गोदरेज कपाट उघडण्यास सुद्धा त्यांनी मनाई केली. कारण मुलांना शासनातर्फे बूट व मोजे देण्यात आले होते. परंतु फक्त बूट काहीच मुलांना देण्यात आले व मोजे एका कपाटात आढळून आले, असे पालकांनी सांगितले.
त्यामुळे उर्वरित कपाटे उघडावीत अशी मागणी पालकांनी समिती समोर केली असता शिक्षक मंगेश कदम यांनी ती उघडण्यास मनाई केली. जो पोषण आहार मुलांना देण्यात येतो, त्या आहाराची कमिटी व पालकांनी पाहाणी केले असता सदर पोषण आहार कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत आढळून आला. असा निकृष्ट दर्जाचा आहार मुलांना देण्यात येत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर पालकांनी उद्यापासून म्हणजे बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर पासून शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आहे तशी माहिती चौकशी समितीला लेखी स्वरूपात दिलेली आहे.
हा संपूर्ण प्रकार संतापजनक असल्याने
जोपर्यंत मंगेश कदम या शिक्षकाची शाळेतून बदली होत नाही, तोपर्यंत पालक आपली मुलं शाळेत पाठवणार नाहीत, अशी आक्रमक भूमिका पालकांनी घेतली आहे.
चौकट – तसेच मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळेला शासनातर्फे चार व देवधे ग्रामपंचायती कडून दोन असे सहा कॅमेरे प्राप्त झालेले आहेत.मात्र ते बंद स्थितीत आढळले. शाळा व्यवस्थापन समितीने सांगूनही शिक्षक मंगेश कदम यांनी ते चालू केलेले नाहीत. त्यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे शिवाय मुख्य कार्यालयात, स्वयंपाघर अशा ठिकाणी सुद्धा कॅमेराचा वापर नाही याबाबत पालक व ग्रामस्थ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.










