संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांचे मासिक अर्थसहाय्य ₹ १५०० वरून ₹ २५०० होणार

ऑक्टोबरपासून दिव्यांगांना होणार लाभ : नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांची माहिती 

सावंतवाडी । प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. या दोन्ही योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य (पेन्शन) रुपये १,५०० वरून थेट रुपये २,५०० पर्यंत वाढवण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.

यासंबंधीचा शासन निर्णय (GR) विसयो / २०२५ / प्र.क. ६९ दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, वाढीव अर्थसहाय्याची रक्कम दिव्यांगांना ऑक्टोबर २०२५ महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. म्हणजेच, ऑक्टोबर महिन्याचे अर्थसहाय्य आता ₹ २५०० या नवीन दराने मिळणार आहे.

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) या संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनंत उचगांवकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, सर्व दिव्यांग बांधवांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे. त्यांनी पुढे माहिती दिली की, वाढ झालेली ही एकत्रित रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होईल.

या महत्त्वाच्या शासन निर्णयाची अधिकृत माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांगांच्या आयुष्यात आर्थिक आधार देणारा हा शासनाचा निर्णय त्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.