कोकणकला व शिक्षण विकास संस्थेतर्फे दिवाळी फराळ प्रशिक्षण 

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल

सावंतवाडी । प्रतिनिधी: महिलांचे सक्षमीकरण आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि श्री प्रभू विश्वकर्मा पांचाळ मनु-मय संस्था, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एस. पी. एम. रोडवरील विश्वकर्मा मनु-मय संस्थेच्या सभागृहात नुकतेच दिवाळी फराळ प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

दीपप्रज्वलन करून व विश्वकर्मा देवाचे स्मरण करत कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात झाली. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विश्वकर्मा संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर सुतार, सेक्रेटरी किशोर कणबरकर, डायरेक्टर महादेव तोंडकर, विनायक देसाई, महिला मंडळ व्हाइस प्रेसिडेंट रंजना मोदगेकर, सुवर्ण कर्नाटक मानव अधिकार जिल्हाध्यक्ष सुनीता सुभेदार, प्रदीप सुतार, प्रसन्ना लोहार, धर्मा लोहार आणि प्रशिक्षक अर्चना व उज्वला पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या २७ महिलांना दिवाळीत तयार केल्या जाणाऱ्या ११ प्रकारच्या पारंपरिक फराळाच्या पदार्थांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमामुळे आपल्याला मोठा आत्मविश्वास व प्रेरणा मिळाल्याचे मत प्रशिक्षणार्थी महिलांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विश्वकर्मा संघाचे अध्यक्ष भरत शिरोळकर यांनी बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच, महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करता यावा यासाठी संस्थेचा हॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

हा उपक्रम महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी एक प्रभावी पाऊल असून त्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण संस्थेच्या श्रीदेवी दंडकर मॅडम यांनी यावेळी केले.

प्रशिक्षणाच्या यशस्वी समाप्तीनंतर सहभागी झालेल्या सर्व महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महिलांच्या कलागुणांना वाव देणारा आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणारा हा उपक्रम बेळगावमध्ये चांगलाच यशस्वी ठरला.